केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या दहा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या शहरांसह हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि.सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. राज्यस्तरीय यंत्रणेकडून याबाबतच्या कार्यवाहीचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून तपासणी झाल्यानंतर ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्प्यात राज्यातील दहा शहरांची या संस्थेकडून तपासणी सुरु आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत. राज्यात नगरविकास विभागाकडून या अभियानाची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने पुढील वर्षांत पूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीबद्दल विशेष आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या द्रष्टेपणामुळे स्वच्छ भारत अभियान हे देशातील एक प्रमुख जनआंदोलन झाले असल्याचे प्रशंसोद्गार काढतानाच राज्यातील हागणदारीमुक्त झालेल्या शहरांसह अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचेही त्यांनी अभिनंदन केले आहे.