जळगाव – शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक फुटू शकतील. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मते कधीही फुटणार नाहीत. शिवसेनेची मते बाळासाहेबांना मानणारी आहेत, असा विश्‍वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील केमिस्ट भवनात शिवसेनेतर्फे आयोजित जळगाव लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व डॉ. हर्षल माने, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. सावंत म्हणाले की, राज्यात सध्या ठिकठिकाणी जी परिस्थिती उद्भवली, तेथे शिवसेनेतर्फे मेळावे घेण्यात येत आहेत.

जळगावातला मेळावा हा त्यातला भाग आहे. ग्रामीण भागातील शिवसेना कार्यरत नाही, असा आरोप करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शिवसेनेचे कार्य जोमात सुरू आहे. ते दाखविण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला आहे. मेळाव्यास जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाखाप्रमुखांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे शिवसेनेचे सदस्य उपस्थित होते, असे सांगत ते म्हणाले की, शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक फुटू शकतील. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मते कधीही फुटणार नाहीत. कारण, शिवसेनेची मते बाळासाहेबांना मानणारी आहेत, शिवसेनेला मानणारी आहेत, उद्धव ठाकरेंना मानणारी आहेत. ती मते आजही शाबूत आहेत. ग्रामीण भागातील शिवसैनिकही आता जोमाने कामाला लागला आहे. शिवसेनेच्या जीवावर पैसे कमविलेले हे लोक आहेत, ते स्वतःस्वार्थासाठी गेले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेना फुटत नाही. ईडीला घाबरत नाही. मरणाला घाबरत नाही. सध्या न्यायालयीन लढाई वरिष्ठ नेते लढत आहेत. बंड केलेले आमदार 11 जुलैपर्यंत राज्यात येऊ शकत नाहीत. जळगावच्या बंडखोरांना गुवाहाटीतून न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. माझा फक्त गद्दारांवर रोष आहे. बंडखोरांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी आणि निवडून यावे, असे आव्हानही श्री. सावंत यांनी दिले.