अहिल्यानगर: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असतानाच महाविकास आघाडीमधील जागावाटप व उमेदवारीचा गोंधळ उघड झाला आहे. शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके तर कॉंग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण हे दोघे उद्या अर्ज दाखल करणार आहेत. कॉंग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी यापूर्वीच अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीमधील जागा वाटपात विधान परिषदेच्या अहिल्यानगर मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असल्याचे जाहीर केले. मात्र असे असतानाच शरद पवार गटाचे खासदार लंके यांच्या पत्नी उद्या अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसने अहिल्यानगरची जागा पक्षाची असल्याची जाहीर केले असली तरी या पक्षामध्येही उमेदवारीवरून गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेसचे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी दोन दिवसांपूर्वीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असे असतानाच काल, शनिवारी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार म्हणून दीप चव्हाण व करण ससाने या दोघांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
काल झालेल्या बैठकीत थोरात यांनी दीप चव्हाण व करण ससाने या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. दीप चव्हाण हे अहिल्यानगरचे माजी महापौर व पक्षाचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष आहेत. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही जागावाटप व उमेदवारीवरून धूसफूस असल्याचे अखेरच्या क्षणी उघड झाले आहे.
शरद पवार गटाच्या राणी लंके उद्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याची माहिती काँग्रेसला नव्हती, असे समजले. याबाबत कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र राणी लंके उद्या आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी सांगितले. विधान परिषदेची अहिल्यानगर जागा यापूर्वी शिवसेनेने लढवली होती. मात्र ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांची अद्याप एकत्रित बैठक झालेली नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे महायुतीच्या तुलनेत मतदारांचे संख्याबळ नगण्यच आहे.
