राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने एकीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही बैठकांचा धडाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच आज (२९ मे) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार? याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडी संपूर्ण १७ जागा लढवणार असून यापैकी १५ जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं आहे. तसेच राहिलेल्या दोन जागांबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“विधानपरिषदेच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर आज आमची महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. १७ जागांपैकी १५ जागांबाबत आमचा निर्णय झाला आहे. कोणता पक्ष कोणती जागा लढवेल? यावर आमचं एकमत झालं आहे. मात्र, दोन ठिकाणच्या दोन जागांबाबत आमची अद्याप चर्चा सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसांत या राहिलेल्या दोन जागांबाबत देखील आमचा अंतिम निर्णय होईल. नांदेड आणि नाशिकच्या जागेबाबत आमच्या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही जागा वगळता इतर १५ जागांबाबत आम्ही आज निर्णय जाहीर केला आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे.
कोणता पक्ष कुठे आणि किती जागा लढणार?
काँग्रेस : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि पोटनिवडणूक असलेल्या नागपूर या ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितली आहे.
शिवसेना (ठाकरे): रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार ) : पुणे, ठाणे, सातारा-सांगली या तीन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची महायुतीवर टीका
“विधानपरिषदेच्या या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरं जात आहोत. या निवडणुकीचा जो मुद्दा आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घोडेबाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी या निवडणुकीत पुढे जात आहोत. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जात असल्याचं दिसत आहे. पैसा फेक तमाशा देख अशी सर्व परिस्थिती आहे. अनेक ठिकणी ५ लाख रुपये देऊन नगरसेवकांना उचलण्यात येत आहे, या निवडणुकीत फक्त विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी पक्ष देखील आपआपल्या मित्र पक्षांचे मतदार पळवत असून असा अशा प्रकारे हा घोडेबाजार सुरू आहे”, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
महाविकास आघाडीत कोणत्या दोन जागांवरून तिढा?
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत विधानपरिषदेच्या कोणत्या जागा लढवणार? याची घोषणा केली आहे. मात्र, १७ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं असून राहिलेत्या दोन जागांबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमत होऊ शकलं नाही. नांदेड आणि नाशिकच्या जागेबाबत महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे नांदेड आणि नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे. मात्र, याबाबतही दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
महायुतीच्या जागावाटपाची घोषणा कधी?
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महायुतीमधील कोणते पक्ष किती जागा लढवतात? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या १७ जागा वाटपाचा महायुतीचाही फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा आहेत. १७ जागांपैकी ११ जागांवर भाजपा लढण्याची शक्यता आहे, तर ४ जागा शिवसेना शिंदे पक्षाला तर दोन जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
