मुंबई: महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी राज्यसभेची एकमेव जागा कोणी लढवावी यावर महाविकास आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सहमती होऊ शकली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यापाठाेपाठ काँग्रेसनेही राज्यसभेसाठी दावा प्रबळ केला आहे. राज्यसभेतील पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठीच काँग्रेसला राज्यसभेसाठी उमेदवारी देणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आल्याने आघाडीत राज्यसभेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष हा शरद पवार यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहे. आदित्य ठाकरे यांनी मात्र संख्याबाळाच्या आधारावर यावेळी राज्यसभेवर शिवसेनेची (ठाकरे) संधी असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठकीची माहिती दिली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल. सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करणार आहोत. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रितरीत्या निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, अमिन पटेल तर शिवसेनेकडून (ठाकरे) आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत संधी
राज्यसभेसाठी काँग्रेसदा दावा प्रबळ करण्यासाठी या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर कायम राहावे असाही प्रस्ताव काँग्रेसकडून ठेवण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असल्याने त्यांनी विधान परिषदेवर पुन्हा निवडून यावे, असा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र शिवसेनेने (ठाकरे) राज्यसभेसाठी आग्रह कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आणि राष्ट्रवादीचा विलीनीकरणाचा मुद्दा यामुळे राष्ट्रवादीला ही जागा सोडल्यास पुढे वेगळे राजकीय समिकरण जुळण्याचा धोका असल्याने शिवसेनेकडून (ठाकरे) राष्ट्रवादीला जागा सोडण्याची तयारी नसल्याचे समजते.
शरद पवार यांची इच्छा जाणून घेणार
शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर पक्षाची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्यासाठी त्यांनाच उमेदवारी मिळणे आवश्यक आहे. शरद पवार यांची वैयक्तिक इच्छा काय आहे, हे जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आपली अंतिम भूमिका जाहीर करेल, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.

