कराड : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. पण, विधानसभेला गडबड झाली, ‘दाल में कुछ काला है, असाच विधानसभेचा निकाल लागल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला.कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पुढाकाराने घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील होते. तर, सह्याद्री साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मानसिंगराव जगदाळे, नेताजी चव्हाण, संगीता साळुंखे, दत्तात्रय चव्हाण, राजेंद्र पाटील, स्वाती पवार, शंकरराव खापे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे आमदार घराबाहेर न पडताही निवडून आले. परंतु, इतिहास साक्षी आहे. सत्य लपून राहत नाही. एक दिवस ते उघड होईल. लोकशाहीत ताकद असून, संघर्षात आम्ही लढत आहोत. तुतारी वाजवण्यासाठी दोन हातांचं बळ लागते. हे विसरून चालणार नसल्याचे सांगत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, सध्या सुरू असलेली लोकशाहीतील दडपशाही मोडून काढली पाहिजे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाने राज्याला दिशा देण्याचे काम केले, आताची वेळ वेगळी आहे. निवडणुकीत कोणा एकाला संधी मिळत असते, म्हणून कोणी नाराज होऊ नये, सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आता माझे सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे. वेळ आल्यावर हिशेब करणार असल्याचा इशारा बाळासाहेबांनी विरोधकांना दिला. स्वाती पवार यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक नेताजी चव्हाण यांनी केले.
