लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं. यानंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही भाष्य करण्यात आलं. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, “भाजपाचा अजिंक्यपणा किती फोल, हे जनतेनं दाखवून दिलं. लोकसभा निवडणूक ही अंतिम नाही तर ही लढाई आता सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत असं वातावरण होतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे जनतेचे आम्ही आभार मानतो. लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी एक लढाई होती. मला माझा अभिमान आहे, कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व नागरिकांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला जो कौल दिला त्यामुळे हा विजय झाला. पण हा विजय अंतिम नाही तर ही लढाई सुरू झाली आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसचीही मदत मिळाली”, सुनील तकरेंच्या दाव्याने मविआ चिंतेत; नेमका रोख कोणाकडे?

“आता दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येईल. मोदी सरकार हे आता एनडीएचं सरकार झालं आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीत आमच्याबाबत जे म्हटलं जायचं की, नैसर्गिक आणि अनैसर्गिक युती. मग आता दिल्लीतील युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा प्रश्न आहे. देशातील जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, त्यामुळे हे मोठं यश आहे असं मी मानतो”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

विधानसभा एकत्र लढणार

“जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते. येणारी विधानसभेची निवडणूक जे जे लोक आमच्याबरोबर आहेत. तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत”, असं आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं गणित उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

“महाविकास आघाडीला महाराष्ट्रत मोठं यश मिळालं. या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. त्यामुळे या सर्वांचे आभार आम्ही मानतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठा पाठिंबा दिला. भाजपाला शेतकऱ्यांनी चांगला धडा शिकवला. काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. मात्र, धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची प्राथमिक बैठक झाली. लोकसभेप्रमाणे आम्ही विधानसभेची निवडणूकही लढणार आहोत”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्ट केलं.