लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं. महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश आलं. यानंतर आता राज्यात दोन-तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं गणित कसं असेल? यावर चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच लोकसभा निवडणूक ही अंतिम नाही तर ही लढाई आता सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार आहे, अशी भूमिका यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडली. तसेच राष्ट्रावादी शरद पवार गटाला जे सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल का? की त्यांच्यासाठी परतीचे दार बंद झाले आहेत? यावर शरद पवार यांनी भाष्य केलं.

हेही वाचा : भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”

शरद पवार काय म्हणाले?

जे सोडून गेले त्यांना पुन्हा घेणार नाही, असी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. आता तुमचेही काही लोक तुम्हाला सोडून गेले आहेत. मग तुम्ही त्यांना परत घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी फक्त चार शब्दांत दिलं. ते म्हणाले, “सवालही पैदा नही होता.”

अजित पवारांवरील ब्रँड व्हॅल्यूच्या टीकेवरही भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकमध्ये रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखात अजित पवार यांच्यावर भाष्य करण्यात आलं होतं. त्यामध्ये अजित पवारांमुळे भाजपाची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, असा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. यावर आता आज झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार म्हणाले, “भाजपाला जो काही अनुभव आला, तो त्यांनी सांगितला. आम्ही त्यात काही बोलू इच्छित नाही.”

उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

“लोकसभा निवडणुकीत असं वातावरण होतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्राती जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे आम्ही आभार मानतो. लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी एक लढाई होती. मला माझा अभिमान आहे, कारण मी माझ्या भाषणात देशभक्त, बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व नागरिकांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला जनतेने जो कौल दिला त्यामुळे हा विजय अंतिम नाही, तर ही लढाई सुरू झाली आहे”, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाला दिला.