सांगली : कायदा मोडून एफआरपीचे हप्ते, कर्जमाफीतील दिरंगाई, सन्मान योजनेतील मदतीचा पत्ता नाही, अशा शेतकरीविरोधी धोरणांमुळेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आपण निर्णय घेतला असून यापुढील सर्व निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढविणार असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी भिलवडी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शेट्टी म्हणाले,की महापुराच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २०१९ प्रमाणे मदत देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना सन्मान योजनेतून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, सरकार काहीच करत नाही. उसाची एकरकमी एफआरपी कायद्यानुसार देणे बंधनकारक असताना त्याचे हप्ते पाडून देण्याचा निर्णय या सरकारने घेतला. या सरकारचे निर्णय हे शेतकरी विरोधी असल्यानेच आपण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

या पुढील सर्व निवडणुका खासदार, आमदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे घेऊन लागवड केली. मात्र, पिकाला शेंगाच लागल्या नसल्याने महाबीजचे बियाणे सदोष असल्याचे स्पष्ट झाले. महाबीज ही सरकारी मालकीची कंपनी असल्याने एकप्रकारे शेतकऱ्यांची सरकारनेच फसवणूक केली असल्याचे शेट्टी म्हणाले.