मुंबई : दोन वर्षांपासून रडतखडत चालेल्या स्मार्ट मीटर जोडणी योजनेला गेल्या काही महिन्यात राज्यात वेग आला असून एक कोटींहून अधिक ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात यश आले आहे.
महत्वाचे म्हणजे, या मीटरमुळे अनेक वीज ग्राहकाना आपल्या बिलात स्मार्ट बचत करता आली आहे. विजेची मागणी कमी असताना स्मार्ट मीटरचा वापर केल्यास प्रति युनिट ८० ते ९० पैशांची बचत होते. महावितरणच्या या योजनेमुळे गेल्या वर्षी ग्राहकाने १०० कोटीची बचत करता आली.
महावितरणकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील दोन महिन्यात तब्बल २० लाखांहून अधिक ग्राहकांनी स्मार्ट मीटर जोडणी घेतली. जोडणीचा वेग कायम राहिल्यास पुढील वर्षी मार्चपर्यंत घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडला (महावितरण) यश येईल, असा दावा महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.
स्मार्ट मीटरचा विरोध कमी करण्याकरिता महावितरणने जुनी मीटर बदलून स्मार्ट लावण्याकरिता आकारण्यात आलेले शुल्क माफ केले. आता केवळ नवीन मीटरकरिता शुल्क आकारले जात आहे. तसेच, प्री-पेड ऐवजी पोस्ट-पेडचा पर्याय देऊ केला. शिवाय ग्राहकांना वीज बिल बचतीचे म्हणजे ‘टाइम ऑफ डे’चे (टीओडी) फायदे दिले जात आहेत. यामुळे विजेची मागणी कमी असताना वापर केल्यास दर कमी असल्याने वीज बिल दरात कपात होते. या उपाययोजनांमुळे ग्राहकांचा विरोध मावळून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला गती आली आहे. अकोला, अमरावती विभाग मात्र कमालीचे मागे असून या ठिकाणी अवघ्या चार टक्के घरगुती,औद्योगिक व व्यापारी ग्राहकांना स्मार्ट मीटर जोडणी देण्यात यश आले आहे.
राज्यात अदानी, एनसीसी, माँटे कार्लो, जीनस या चार कंपन्यांकडून घरगुती, औद्योगिक, व्यापारी, कृषि, सरकारी संस्था, कार्यालये, महामंडळांची अशी तब्बल ४ कोटी ४२ लाख जुनी मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविली जात आहेत. ९ एप्रिल, २०२६पर्यंत यापैकी १ कोटी ६ लाख ३४ हजार २३७ ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्यात यश आले. १५ फेब्रुवारी, २०२६पर्यंत हा आकडा ८६ लाख इतका होता. त्यात अवघ्या दोन महिन्यात आणखी २०.३४ लाख ग्राहकांची भर पडली आहे. यात घरगुती, औद्याेगिक व व्यापारी ग्राहकांची संख्या ७६.४९ लाख इतकी आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार मार्च महिन्यात हे काम पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, २०२४ साली सुरू झालेल्या या माेहिमेला ग्राहक संघटना, वीज कर्मचारी संघटनांकडून जोरदार विरोध झाल्याने ही मोहिम जोर पकडत नव्हती. त्यामुळे केंद्र सरकारने योजनेला दोन वर्षांची मुदतवाढ दिली.
अकोला, अमरावती विभाग मागे
महावितरणच्या अकोला, अमरावती परिमंडळात १७ लाख ७७ हजार १८८ घरगुती, औद्याेगिक व व्यापारी ग्राहक आहेत. यापैकी ६५ हजार ३०४ जणांना स्मार्ट मीटर जोडणी देण्यात आली आहे. हे प्रमाण अवघे ३.३७ टक्के इतके आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया परिमंडळातील या गटातील २७ लाख ८५ हजार७७८ ग्राहकांपैकी ९.५९ लाख ग्राहकांना स्मार्ट मीटर जोडणी देण्यात आली आहे.
ग्राहकांची १०० कोटींची बचत
स्मार्ट मीटरमुळे वीजवापर अचूक मोजता येतो. आपला दिवसभराचा वीजवापर ग्राहकांना पाहता येत असल्याने रिडींगविषयीच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तसेच, टीओडीमुळे प्रति युनिट ८० ते ९० पैसे वाचविणे ग्राहकांना शक्य होते. त्यामुळे गेल्या वर्षी स्मार्ट मीटर ग्राहकांना तब्बल १०० कोटींची वीज बिल बचत करता आली. – लोकेश चंद्र, अध्यक्ष, महावितरण
स्मार्ट मीटरबाबत मतभेद
स्मार्ट मीटरच्या फायद्यांबाबत अजुनही मतभेद आहेत. वेस्टर्न सबर्ब हाऊसिंग फेडरेशनच्या सहसचिव सुनिता गोडबोले यांच्या मते ग्राहकांमध्ये या मीटरबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. मी स्वत त्याची वापरकर्ती आहे. स्मार्ट मीटरमुळे तक्रार निवारण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याचा अनुभव आहे. फेडरेशनच्या वतीने या संबंधात आपण जनजागृती करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाराष्ट्र वीज कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या समस्यांमध्ये भर पडल्याचा दावा केला. गेल्या महिन्यात राज्यात तब्बल ३४ हजार ग्राहकांची वीजजोडणी यामुळे तोडावी लागली. कारण, वीज देयक भरले नाही तर स्मार्ट मीटरमुळे तात्काळ वीज तोडली जाते. ती पूर्ववत करण्यास तीन-चार दिवस जातात. यामुळे ग्राहकांच्या हालात भर पडल्याचा दावा शर्मा यांनी केला.
