अहिल्यानगर: जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या १२ पैकी सर्वाधित १० पालिकांच्या निवडणुका भाजप लढवत आहे. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) ९ पालिकातील रिंगणात उतरला आहे. महायुतीमध्ये भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६ तर शिवसेना (शिंदे गट) ९ पालिकांत एकमेकांच्या विरोधात लढत आहे. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या विरोधात शिवसेना (ठाकरे गट) श्रीरामपूर व शिर्डीमध्ये तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरोधात काँग्रेस अशी लढत जामखेडमध्ये होत आहे.
राहुरीच्या निवडणुकीतून घड्याळ व तुतारी, तर संगमनेर, श्रीगोंद्यात काँग्रेस चिन्ह गायब झालेले आहे. बुधवारी (दि. २६) चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराच्या तोफा धडकू लागतील. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने सर्वच नेत्यांनी राज्य पातळीवरील युती व आघाडी स्थानिक निवडणुकीत बाजूला ठेवण्याची भूमिका घेतली आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा या १० पालिकांच्या नगराध्यक्ष पदासह प्रभागनिहाय उमेदवार भाजपने दिले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेने (शिंदे गट) संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा या ९ तर त्यानंतर तिसर्या क्रमांकावर राष्ट्रवादी (अजित पवार गट) कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा या ६ पालिका लढवत आहे.
भाजपने संगमनेर व नेवासा पालिकेत शिंदे गटाला तर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) शिर्डी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर या चार पालिकेत भाजपला पाठिंबा दिला आहे. शिंदे गटाने शिर्डी, राहाता पालिकेत भाजपला पाठिंबा दिला आहे. शिंदे गट व अजित पवार गट मात्र एक कोठे एकत्र येऊ शकला नाही.
महाविकास आघाड केवळ श्रीगोंदा पालिकेतच झाली आहे. आघाडीत काँग्रेस ५, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ३ तर ठाकरे गट ३ पालिकांच्या निवडणुका लढत आहे. श्रीरामपूर व शिर्डीमध्ये काँग्रेसच्या विरोधात ठाकरे गट आणि जामखेडमध्ये शरद पवार गट विरोधात काँग्रेस अशी लढत आहे. पक्ष व चिन्ह बाजू ठेवून स्थानिक पातळीवर ५ पालिकांच्या निवडणूका स्थानिक विकास आघाडी करून लढविण्यात येत आहे. त्यात संगमनेरमधील संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून काँग्रेस, शरद पवार गट व ठाकरे गट एकत्र आहेत तर राहुरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तेथे विकास आघाडी आहे. राहातामध्ये काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गटासह अन्य पक्षांनी लोकक्रांती आघाडी केली आहे. शिर्डीत स्वाभिमानी आघाडी तयार झाली आहे.
