रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नऊही पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निवडींमध्ये शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. नऊपैकी आठ पंचायत समित्यांवर शिवसेनेचे सभापती विराजमान झाले असून चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद मिळाले. तर गुहागर आणि राजापूर येथे भाजपला उपसभापतीपद देत युतीधर्म पाळण्यात आला. या निवडींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांना मिळालेले मोठे प्रतिनिधित्व. नऊपैकी पाच पंचायत समित्यांमध्ये महिलांनी सभापतीपदाची धुरा सांभाळली आहे.

चिपळूणचा तिढा अखेर सुटला

जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष चिपळूण पंचायत समितीच्या निर्णयाकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे स्वबळावर निवडणूक लढवत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे सत्तासमीकरणाबाबत उत्सुकता होती. अखेर महायुतीच्या शिष्टाईत पहिल्या अडीच वर्षांसाठी सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सूर्यकांत खेतले सभापती, तर शिवसेनेचे संदेश आयरे उपसभापती झाले. ठाकरे गटाची शिवसेना येथे विरोधात बसली आहे.

काही ठिकाणी निर्विवाद सत्ता

रत्नागिरी व लांजा पंचायत समित्यांमध्ये शिवसेना-भाजपची स्पष्ट बहुमताची सत्ता असल्यामुळे निवड प्रक्रिया सुरळीत पार पडली. रत्नागिरी पंचायत समितीसाठी प्रवीण पांचाळ सभापती, गजानन धनावडे उपसभापती तर लांजा समितीसाठी  मानसी आंबेकर यांची सभापती, आदेश आंबोळकर उपसभापती, संगमेश्वरसाठी  शर्वरी वेल्ये (सभापती), प्रफुल्ल बाईत (उपसभापती राष्ट्रवादी), दापोली पंचायत समितीसाठी उन्मेष राजे (सभापती), नम्रता तोडणकर (उपसभापती) तसेच खेड पंचायत समितीसाठी डॉ. अफिया पालेकर (सभापती), सुनील मोरे (उपसभापती) निवड करण्यात आली आहे.

भाजपला उपसभापतीपदे

राजापूर व गुहागर पंचायत समित्यांमध्ये भाजपला उपसभापतीपदे देत युतीचा फॉर्म्युला राबवण्यात आला. राजापूर पंचायत समितीच्या  नंदिनी नितीन कदम (सभापती – शिवसेना) व अभिजित गुरव (उपसभापती भाजप) तसेच गुहागर समितीसाठी  प्रणव पोळेकर (सभापती शिवसेना), नीलेश सुर्वे (उपसभापती भाजप) यांची निवड करण्यात आली आहे. मंडणगड पंचायत समितीत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्यामुळे प्रणाली चिले सभापती तर दीपक मालुसरे उपसभापती म्हणून निवडून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर महायुतीचा ठसा उमटला असून शिवसेना सर्वाधिक प्रभावी ठरली आहे. तसेच महिलांना मिळालेल्या मोठ्या प्रतिनिधित्वामुळे स्थानिक राजकारणात महिलांची भूमिका अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.