सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. ५० पैकी ४१ जागा जिंकत महायुतीने जिल्ह्यावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असला, तरी आता खऱ्या अर्थाने लक्ष लागून राहिले आहे ते ‘अध्यक्ष’ कोणाचा होणार याकडे. जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट असले, तरी तो खासदार नारायण राणे यांचा समर्थक असेल की भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा, याबाबत राजकीय वर्तुळात खल सुरू झाला आहे.
निवडणुकीचे पक्षनिहाय बलाबल
या निवडणुकीत महायुतीने ५० पैकी ४१ जागांवर विजय मिळवला आहे.
पक्षनिहाय आकडेवारी :
- भाजप: २७ जागा
- शिंदे शिवसेना: १४ जागा
- ठाकरे शिवसेना: ०३ जागा
- अपक्ष: ०६ जागा
भाजपने स्वबळावर बहुमताचा टप्पा पार केला असून, विजयी ६ अपक्ष हे भाजप आणि शिंदे शिवसेनेचेच बंडखोर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ४७ पर्यंत पोहोचले आहे.
अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असले तरी महायुतीच्या फॉर्म्युलानुसार शिंदे गटाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. मात्र, भाजप अंतर्गत दोन गट सक्रिय झाल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आपल्या समर्थकाला अध्यक्षपदी बसवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे खासदार नारायण राणे आपल्या समर्थकासाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांमधील संभाव्य पेच पाहता, अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विरोधकांचा सुपडा साफ
या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ३५ उमेदवार रिंगणात असूनही केवळ ३ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. तसेच काँग्रेस,शरद पवार राष्ट्रवादी, आणि मनसे यांचा प्रभाव या निवडणुकीत पूर्णपणे शून्य असल्याचे दिसून आले. विरोधकांच्या या पराभवामागे महायुतीची ‘मनी पॉवर’ आणि नियोजनबद्ध रणनीती कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
आगामी काळात भाजपचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे आणि आ. दीपक केसरकर हे एकत्र बसून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन करतील, अशी अपेक्षा आहे.
