रत्नागिरी : प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या नावावर आयोजित करण्यात आलेल्या गायन कार्यक्रमाबाबत रत्नागिरीत मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रमोद महाजन क्रीडांगण येथे रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, कार्यक्रमच न झाल्याने रसिक प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची तिकिटे स्थानिक पातळीवर तसेच बुक माय शो वर विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील विविध भागांतील अनेक रसिकांनी तिकिटे खरेदी करून खास रत्नागिरी गाठले.
मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमस्थळी कोणतीही तयारी नसल्याचे आढळून आले. ना स्टेज, ना रोषणाई, ना आयोजक अशा परिस्थितीत आलेल्या प्रेक्षकांचा पूर्णतः हिरमोड झाला. यामुळे आयोजकांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
हा कार्यक्रम पुण्याच्या गंधार जोग आणि दिवेश बापट यांच्या ‘एकदंत थिएटर’ आणि ‘ताल इंटरटेनमेंट’तर्फे आयोजित करण्यात आला होता. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम पाच दिवसांपूर्वीच रद्द केल्याची माहिती त्यांनी बुक माय शो ला दिली होती. मात्र बुक माय शो च्या म्हणण्यानुसार, त्यांना अशी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळपर्यंत तिकीट विक्री सुरू होती.
सुमारे १५०० प्रेक्षक क्षमतेच्या या कार्यक्रमासाठी ५०० ते ३५०० रुपये दराची तिकिटे ठेवण्यात आली होती. लाखोंची उलाढाल झाल्याचे सांगितले जात असून, यामुळे प्रेक्षकांची आर्थिक व मानसिक फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे.
कोल्हापूरहून आलेल्या एका महिला रसिकांनी सांगितले की, त्या खास गाडी करून, हॉटेल बुकिंग करून कार्यक्रमासाठी आल्या होत्या. “आम्ही आमच्या गुरूंना ऐकण्यासाठी आलो होतो, पण इथे आल्यावर काहीच नसल्याचे पाहून खूप वाईट वाटले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांच्या मते, एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी, पोलीस परवानगी किंवा अन्य हालचाली दिसल्या नसल्यामुळे स्थानिकांनाही कार्यक्रमाबाबत शंका होती. दरम्यान, या प्रकरणी संतप्त प्रेक्षकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
