Mahesh Tutorials Bankruptcy : तीन दशकांहून अधिक काळ खासगी शिकवणीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा दाखवणारे महेश ट्युटोरियल्स ही खासगी शिकवणीची एकेकाळी गजबजलेली संस्था सध्या स्मशानशांत झाली आहे. एमटी एज्युकेअर म्हणजेच पूर्वाश्रमीची महेश ट्युटोरियल्स या संस्थेने गाशा गुंडाळला आहे. देशभरात जवळपास ६० शाखा अचानक बंद झाल्या आहेत. आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क मोजलेले पालक आणि शिकवणीच्याच भरवशावर असलेले विद्यार्थी सध्या महेश ट्युटोरियल्सच्या वर्गांची बंद दारे ठोठावत आहेत. दारावर लावलेल्या नोटिसा त्यांच्या भावनांना खिजवत आहेत. शाखांच्या संपर्क क्रमांकाची सेवा तात्पुरती स्थगित झाल्याचेच फक्त ऐकू येत आहे. हे सगळे घडले ते गेल्या पाच ते सहा दिवसांत. काही शाखांमध्ये पालकांची सभा घेऊन कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे वर्ग बंद करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली आणि दोन दिवसांत कामकाज बंद करून वर्गांना टाळे लावण्यात आले. या शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या एका खासगी शिकवणी संस्थेत सोय करण्याची तयारीही एमटी एज्युकेअर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या महेश ट्युटोरियल्सने दाखवली आहे. नाही म्हणायला पालक आणि विद्यार्थ्यांसाठी तो एक दिलासा ठरला आहे. मात्र, तरीही शुल्काचे काय, नव्या शिकवणीची तरी काय हमी, अंतराचे काय, असे अनेक प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांपुढे आहेत. त्याची उत्तरे त्यांना शोधावीच लागणार आहेत.
महेश ट्युटोरियल्स बंद होणे ही एक शिकवणी बंद झाली किंवा एक कंपनी दिवाळखोरीत निघाली, इतकी सरधोपट बाब खचितच नाही. खासगी शिकवणी साम्राज्याच्या उदय-अस्ताची ती गोष्ट आहे. बदलत्या शिक्षण बाजाराचे ते प्रतिबिंब आहे. तूर्तास, या शिक्षण बाजाराची सद्यस्थिती नेमकी काय, याबाबत उहापोह करण्यापूर्वी महेश ट्युटोरियल्सचे यातील स्थान काय आणि नेमके काय झाले, हे समजून घेणे रोचक आहे.
महत्त्वाकांक्षी शिक्षकाची व्यावसायिक वाटचाल
मुंबईतील मुलुंडच्या एका छोट्या वर्गखोलीतून १९८८ साली महेश शेट्टी या गणिताच्या शिक्षकांनी महेश ट्युटोरियल्स ही खासगी शिकवणी संस्था सुरू केली. तेव्हापासून गेली ३८ वर्षे महेश ट्युटोरियल्स खासगी शिकवण्यांच्या बाजारपेठेत नावाजली जात होती. शेट्टी यांची गणित आणि विज्ञान विषयातील शिकवण्याची पद्धत, शिस्त आणि विद्यार्थ्यांशी असलेला संवाद यामुळे महेश ट्युटोरियल्सची ओळख वाढू लागली. खासगी शिकवणी म्हणजे शाळेच्या वर्गात तत्कालीन परिभाषेतील ढ विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्ग, असे स्वरूप बदलून खासगी शिकवणी ही शालेय अध्यापनाला पूरक सुविधा इथपासून ते शिकण्याचे एकमेव स्थान, अशी पालक-विद्यार्थ्यांची धारणा या सगळ्या बदलांच्या पायाभरणीत महेश ट्युटोरियल्सचा मोठा वाटा होता. जवळपास राहणाऱ्या काकू, ताई, दादा, निवृत्त शिक्षक, अधिकारी यांच्या घरातील एका खोलीत, पडवीत, ओसरीत भरणाऱ्या ८-१० मुलांचा वर्ग, असे शिकवणीचे स्वरूप बदलून त्याला संस्थात्मक पातळीवर महेश ट्युटोरियल्सने ओळख मिळवून दिली. सुरुवातीला आठवी ते दहावीच्या राज्यमंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, मग अकरावी, बारावी विज्ञान, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी, कालौघात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई या शिक्षण मंडळांच्या शाळांच्या अभ्यासक्रमाच्या शिकवण्या, अशी मजल दरमजल महेश ट्युटोरियल्सची सुरू होती. देशभरात १९९० नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रस्थ वाढले आणि अनुषंगाने परीक्षा, निकाल, प्रवेश यांची गणिते बदलली. हे बदल अचूक हेरण्याचे व्यावसायिक चातुर्य महेश ट्युटोरियल्सच्या संचालक आणि शिक्षकांकडे होते. त्यानंतर या संस्थेचा विस्तार झपाट्याने वाढला. मुंबई शहर-महानगर, पुणे, नागपूर, नाशिक, सातारा, अकलूज, अहिल्यानगर अशा शाखा उभ्या राहिल्या. देशभरात शिकवण्यांची पंढरी असलेले राजस्थान, पंजाब, कर्नाटक येथेही शाखा उभ्या राहिल्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिगेला पोहोचलेल्या स्पर्धेमुळे २००० सालानंतर शालान्त परीक्षांबरोबर प्रवेश परीक्षांचीही चाळणी आली. त्यानंतर खासगी शिकवण्यांचा बाजार फोफावला. तोवर ब्रँड म्हणून स्थिरावलेल्या महेश ट्युटोरियल्सने जेईई, नीट, सीईटी या परीक्षांच्या तयारीतही पाय रोवले. त्यानंतर या संस्थेची ओळखही बदलली. महेश ट्युटोरियल्स एमटी एज्युकेअर या कॉर्पोरेट रूपात पुढे आली. तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल शिक्षण, दिवसभराचे प्रशिक्षण वर्ग अशा नानाविध प्रवाह संस्थेने स्वीकारले. एमटी एज्युकेअर ही संस्था २०१२ मध्ये भांडवली बाजारात सूचीबद्ध झाली. एका शिक्षकाने सुरू केलेला शिकवणी वर्ग कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायात बदलला होता. देशभरात सध्या साधारण ६० शाखा कार्यरत होत्या. तर प्रत्येक अभ्यासक्रमानुसार दोन लाख रुपयांपासून पुढे असे शुल्क आकारण्यात येत होते.
शिकवणी वर्ग बंद का झाले?
नावाजलेल्या एमटी एज्युकेअरच्या पडझडीची सुरुवात साधारण करोनाच्या साथीच्या दरम्यान झाली. २००० नंतर आणखी अनेक मोठे ब्रँड्स खासगी शिकवण्यांच्या बाजारात उतरले. अनेक मोठ्या नामांकित कंपन्यांनी या व्यवसायात गुंतवणूक सुरू केली. कोटासारखी शिकवणी बाजाराची केंद्रे देशभरात उभी राहिली. खासगी शिकवण्यांच्या बाजारातील स्पर्धा देशात सध्या शिगेला पोहोचली आहे. ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. करोना काळात ही लाट झपाट्याने पसरली आणि बाजारपेठेची गणिते आणखी बदलत गेली. ऑनलाईन शिकवण्यांचे अनेक ब्रँड्स उभे राहिले. त्यांनी शिकवण्यांच्या पारंपरिक प्रारूपाला आव्हान दिले. या सगळ्याचा तडाखा एमटी एज्युकेअरला काही प्रमाणात बसला. तसेच काही चुकलेले आर्थिक व्यवहार संस्थेला अस्ताकडे घेऊन गेले. साधारण २०२२ पासून कंपनी आर्थिक अडचणीत अडकली आणि दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत (Insolvency and Bankruptcy Code) प्रकरणे पुढे गेली. दोन वर्षांपूर्वीपासून, २०२४ पासून कंपनी दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षी, ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाही व सहामाहीचे अलेखापरीक्षित (अनऑडिटेड) आर्थिक निकाल सादर करताना स्वतंत्र लेखापरीक्षकांनी अनेक गंभीर आर्थिक आणि लेखा अनियमिततांकडे लक्ष वेधले होते. कंपनीने १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाचे अधिकार सध्या रिझोल्यूशन प्रोफेशनलकडे असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक निकालांची नोंद घेण्यात आली. कंपनी १६ डिसेंबर २०२२ पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार दिवाळखोरी निवारण प्रक्रियेत आहे. लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार, कंपनीविरुद्ध बँका, वित्तीय संस्था, कर्मचारी, वैधानिक प्राधिकरणे आणि इतर कर्जदारांचे दावे दाखल झाले आहेत. त्यांची अंतिम पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कंपनीच्या प्रत्यक्ष देणी किती आहेत, याचे अचूक चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीने सुमारे ६,१९४.९५ लाख रुपयांच्या स्थगित कर मालमत्ता नोंदविल्या आहेत. कंपनीकडे सुमारे ७,४२८.८८ लाख रुपयांची थकीत कर्जे व येणी आहेत. कंपनीची एकूण आर्थिक स्थिती, वाढलेले संचयी तोटे, नकारात्मक निव्वळ संपत्ती आणि चालू मालमत्तेपेक्षा अधिक चालू देणी या पार्श्वभूमीवर कंपनीचे ‘गोइंग कन्सर्न’ म्हणून भविष्यातील अस्तित्वही दिवाळखोरी प्रक्रियेच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महेश शेट्टी सध्या काय करतात?
या सगळ्यात महेश ट्युटोरियल्सचे संस्थापक महेश शेट्टी कुठे आहेत? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. शेट्टी हे या कंपनीतून २०२० सालीच बाहेर पडले. सध्या त्यांची शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक मार्गदर्शन करणारी कंपनी कार्यरत असल्याचे नोंदींवरून दिसते. मात्र, महेश ट्युटोरियल्सच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले शेट्टी आणि त्यांची नवी कंपनी आता प्रसिद्धीपासून दूर राहिली आहे. ते कंपनीतून बाहेर पडल्यानंतर कंपनी दिवाळखोरीत गेली, असे चित्र दिसते. त्याचा अर्थ हे नेतृत्वबदलाचा फटका असा लावावा की शेट्टी यांना परिस्थितीची कल्पना होती, असा हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.
पुढे काय होणार?
वर्ग बंद करण्यापूर्वी काही शाखांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात आली होती. काही ठिकाणी महिनाभर ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. अरिहंत अॅकॅडमीने या संस्थेतील विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने हा काहिसा दिलासा आहे. मात्र, त्याचवेळी एमटी एज्युकेअर ही संस्था विलीन करण्यात आलेली नाही, असेही स्पष्ट केले आहे. शिकवणीचे २ ते ३ लाख रुपये शुल्क बहुतेक सर्वच पालकांनी आगाऊ भरले आहे. अरिहंतमध्ये प्रवेश मिळवून देण्याऐवजी शुल्क परत करावे, अशी पालकांची मागणी आहे. घरापासून, महाविद्यालयापासून जवळ अरिहंतची शाखा नाही, शिक्षक मान्य नाहीत, अधिक शुल्क भरावे लागणार का, एमटी एज्युकेअर त्यांच्याकडे भरलेले शुल्क अरिहंतला देणार असेल तर ते पालकांनाच का परत देत नाहीत, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. मात्र, त्याचे उत्तर अजिबात नाही.
(महेश ट्युटोरियल्स हे या शिकवणी बाजारातील एक उदाहरण. अशा अनेक संस्था तीव्र स्पर्धेत झुंजत आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची ओळख आता ग्राहक अशी आहे. देशभरातील खासगी शिकवण्यांची बाजारपेठ, आव्हाने, बदलते आयाम याचा लेखाजोखा सविस्तरमधील शिक्षणाच्या बाजारगप्पांच्या दुसऱ्या भागात…)
