Mahesh Zagade Statement on Tukaram Mundhe FDA Action: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची चर्चा सध्या राज्यासह देशभरात होत आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यात तुकाराम मुंढे हे नाव देशभरात चर्चेत आले. मुंबई आणि इतर शहरातील मोठ्या हॉटेल्स, आस्थापनांवर मुंढे यांच्या विभागाने धाड टाकून परवाने निलंबित केले. कारवायांची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोज दिली जाते. स्वतः तुकाराम मुंढे हे पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमधून विभागाच्या कार्याची माहिती देत आहे. दरम्यान एफडीएच्या प्रसिद्धी बाबत अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी भाष्य केले आहे.
‘अधिकाऱ्यांची ती मानसिकता भयानक’
मुंबई तक या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महेश झगडे यांना प्रसिद्धीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देत असताना झगडे यांनी त्यांच्या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितले होते की, बऱ्याचवेळेस अधिकारी वाहवत जातात. अधिकारी वाहवत गेल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्ट माझ्या अधिकारात आहे, असे वाटायला लागते. ही मानसिकता अतिशय भयानक आहे.
“चांगल्या अधिकाऱ्याने हे माझ्या अधिकारात आहे, असे म्हणण्याऐवजी ही माझी जबाबदारी आहे, असे म्हणायला हवे. माझा अधिकार याऐवजी माझी जबाबदारी असे अधिकाऱ्याने मानायला हवे. अलीकडे जबाबदारी ऐवजी माझा अधिकार बघितला जातो”, अशीही टिप्पणी माजी आयुक्त झगडे यांनी कुणाचेही नाव न घेता केली.
प्रसिद्धीबाबत आम्हाला मुख्य सचिवांच्या नोटिसा मिळाल्या
सध्या काही अधिकारी प्रसिद्धी झोतात आहेत, याबद्दल बोलताना महेश झगडे म्हणाले, “आमच्यावेळी राज्य शासनात काम करताना प्रसारमाध्यमात आम्ही थोडे जरी दिसायला लागलो तर मुख्य सचिवांकडून नोटीस येत असे. तुमचे काय चालले आहे? असा जाब विचारला जाई. पण आता काळ बदलला आहे. मी त्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही.”
महेश झगडे पुढे म्हणाले की, सध्या आपण कुणावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. कारण शिष्यांची परंपरा सुरू झाली आहे. ही परंपरा योग्य, अयोग्याच्या पलीकडे गेली आहे. शिष्य हे अयोग्यालाही योग्यच म्हणतात.
प्रसिद्धीबाबत अश्विनी भिडे काय म्हणाल्या होत्या?
दरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईबाबत मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त अश्विनी भिडे यांनीही काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. “समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चांगल्या स्वच्छतेची सवय लावण्यासाठी सुरुवातीला अशा तीव्र पावलांची, गाजावाजाची गरजच असते,” अशा शब्दांत अश्विनी भिडे यांनी तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले.
मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, “तुकाराम मुंढे हे प्रशासनातील परिपक्व अधिकारी आहेत. लोकांमध्ये जनजागृती घडवण्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारच्या मोठ्या कारवाईची गरज असते, हे ते उत्तम प्रकारे जाणतात. अन्यथा या विषयाकडे कोणी लक्षही दिले नसते. ते या पदावर पुढील २ ते ३ वर्षे राहतील आणि मला पूर्ण विश्वास आहे की, ते एक मजबूत यंत्रणा उभारतील, जी त्यांच्या नंतरही तितक्याच सक्षमपणे कार्यरत राहील.”
भ्रामक जाहिरातींवर सर्वंकष कारवाईची गरज
दरम्यान ‘इंडिया टुडे’शीही महेश झगडे यांनी याबाबत संवाद साधला होता. ‘विमल’ इलायचीच्या जाहिरातीप्रकरणी तीन आघाडीच्या अभिनेत्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीबाबत इंडिया टुडेने महेश झगडे यांना प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी त्यांच्याच कार्यकाळात तंबाखू, पानमसाला आणि सुगंधी सुपारीवर बंदी घालण्यात आली होती, अशी माहिती दिली.
“भ्रामक जाहिरातींवर अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ५३ नुसार कारवाई झालीच पाहिजे; मात्र ही जबाबदारी केवळ जाहिरातीत दिसणाऱ्या अभिनेत्यांवर न ढकलता, उत्पादन बनवणारे आणि जाहिरात प्रसारित करणारे अशा सर्वांवरच संयुक्तपणे निश्चित केली पाहिजे”, अशी भूमिका माजी आयुक्त महेश झगडे यांनी मांडली.
