मुंबई : देशाच्या संसदेत नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावरुन राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरु होता. राज्यातील लाडक्या बहीणींनी महाविकास आघाडीला धडा शिकवला आहे. आता देशातील लाडक्या बहीणी इंडिया आघाडीला धडा शिकवतील, असे भाकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
‘खासदारांची संख्या वाढवून सत्तेचा अमरपट्टा कायम ठेवण्याचे भाजपचे षडयंत्र विरोधकांनी उधळून लावले. मोदी यांना खोटे बोलण्याचा आजार झाला आहे, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केली.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले. त्यानंतर राज्यातील महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रमुख नेत्यांच्या टीका टिप्पणीनंतर आता दुसऱ्या फळीतील नेत्यांनी टीकेची धार कायम ठेवली आहे. महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते. ते कोसळले. मोदी आणि त्यांच्या मंडळाच्या घसरणीची ही सुरुवात आहे. १६ खासदारांच्या जोरावर मोदी यांचे पंतप्रधान पद टिकले आहे. १६ आकडयाचा चमत्कार होईल असे भाकीत राऊत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार झाल्यानंतर विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकली आहे,असे सांस्कृतिक मंत्री ॲड अशिष शेलार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आघाडीने महिलांचा अपमान केला आहे, असा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला..
महिला आरक्षणाच्या आडून घटना दुरुस्ती करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला विषयी बोल म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात महिला आरक्षण सर्मथक आणि विरोधक असे दोन तट पडले आहेत.
