महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विपणन व्यवस्थित झाले, तरच महिलांच्या आर्थिक उत्पन्नास हातभार लागू शकेल. या दृष्टीने सरकारच्या पातळीवर प्रयत्न करण्याची ग्वाही ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
ग्रामीण महिला गटांच्या वस्तूंचे विभागीय प्रदर्शन, तसेच गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण करण्यात आले. या प्रसंगी मंत्री मुंडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री विद्या ठाकूर, तर प्रमुख म्हणून जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, उपाध्यक्ष दिनकर पवार, प्रधान सचिव उज्ज्वल उके, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची उपस्थिती होती.
महिला कष्टाळू असतात. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव, तसेच बळ दिले पाहिजे, असे सांगत मुंडे म्हणाल्या, की बचत गटातील महिला उत्कृष्ट काम करतात. करिअर वुमन संकल्पनेचे त्या मूर्त स्वरूप आहेत. अशा महिलांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहणार आहे. बँकांचे आर्थिक व्यवहार कसे करावेत याचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात यावे. त्यांच्या मुलांसह सर्व बालकांचे आधार कार्ड तयार करण्याबाबत निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील बालकांना याचा लाभ देण्यात येईल. त्यांना बायोमेट्रिक कार्ड दिले जाईल.
आधार कार्ड बनविण्याचे अभियान उद्यापासून (शुक्रवारी) सुरू करून डिसेंबपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.
मंत्री ठाकूर म्हणाल्या, की बचत गटाच्या महिला हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थापनाचे काम चांगल्या प्रकारे करून मालाची विक्री करतात. मोठ-मोठे व्यवसायही त्या उभे करू शकतील, म्हणून यापुढे केंद्र, राज्याच्या योजना महिलांपर्यंत आवर्जून पोहोचविल्या जातील.
मंत्री मुंडे यांच्या हस्ते महिला बचतगटाची माहिती देणाऱ्या ‘सिद्धा’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. ३११ बचतगटांनी सहभाग नोंदविल्याची माहिती उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी दिली. महिला बचतगटाच्या वस्तूंचे विपणन करण्यासाठी संकेतस्थळ तयार केले आहे. शहरातील
तापडिया अदालत रस्ता मदानावर १९ नोव्हेंबपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. विभागातील महिला, विविध पंचायत समित्यांचे सभापती, जि.प. सदस्य, अधिकारी-कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.