Mahyuti Disruption BJP against Ajit Pawar : “भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपला सावत्र भाऊ आहे”, असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याध्यक्ष (ग्रामीण विभाग) दिलीप देशमुख यांनी केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं”, असं देखील देशमुख यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर देशमुख यांनी राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यावरही आरोप केला आहे. “पवार हे निधी देताना तफावत करतात”, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

दिलीप देशमुख म्हणाले, “आपल्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. यामधील पहिला पक्ष म्हणजे भाजपा, दुसरी शिवसेना आणि तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. खरंतर ते (राष्ट्रवादी) आम्हाला नको होते. कारण भाजपा व शिवसेना हे दोघे सख्खे भाऊ आहेत. यात कोणाचंही दुमत नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपाचा सावत्र भाऊ आहे. त्यांना मुळात युतीत कशासाठी घेतलं तेच कळत नाही. आम्ही तेव्हाही याविरोधात बोललो होतो, आजही कार्यकर्त्यांच्या अशाच भावना आहेत”.

भाजपाचे लातूर जिल्हाध्यक्ष म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत घेतल्यामुळे आमच्या भाजपा कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं. आमचं काहीही चांगलं झालं नाही, कार्यकर्त्यांचे केवळ वाटोळं झालं आहे आणि हीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. काही लोक म्हणतात की आपण आता महायुतीत आहोत तर असं बोलायला नको. परंतु, आमच्यावर अन्याय झाला आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलणार. कारण आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहोत”.

हे ही वाचा >> बदलापूर-कोलकाता प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”

दिलीप देशमुखांची अजित पवारांवरही टीका

दरम्यान, दिलीप देशमुख यांनी अजित पवारांवर निधी देताना तफावत करत असल्याचा आरोप केला. तसेच ते म्हणाले, “अजित पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती धर्म पाळला नाही, मग आम्ही तरी तो का पाळायचा? आम्ही देखील युती धर्म पाळणार नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं आहे. आम्ही आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला एकही मत देणार नाही आणि ही गोष्ट सर्वांना पक्की माहिती असली पाहिजे”.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेसची न्यायालयात याचिका? फडणवीसांच्या आरोपांवर पटोले म्हणाले, “जनतेच्या पैशावर…”

शिवसेनेनेही राष्ट्रवादीला विरोध केला होता

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी धाराशिव येथे एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार गटावर टीका केली होती. सावंत म्हणाले होते, “मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलं नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात. हे सहन होत नाही.