scorecardresearch

जुन्या नाटकांच्या निर्मितीच्या प्रणेत्यांचेच चर्चेतून पलायन!

कविवर्य मोरोपंत नाटय़नगरी (बारामती) ‘जुन्या नाटकांची निर्मिती : यशाची खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका?’ या विषयावरील संमेलनातील परिसंवादात ‘लिमिटेड ओव्हर्स’ची जुनी नाटके आणणाऱ्या सुनील बर्वे आणि नीलम शिर्के या दोन प्रमुख निर्मात्यांनी गैरहजेरी लावल्याने चर्चेतली हवाच काढून घेतली गेली.

कविवर्य मोरोपंत नाटय़नगरी (बारामती)
‘जुन्या नाटकांची निर्मिती : यशाची खात्री की अपयशाच्या भीतीतून सुटका?’ या विषयावरील संमेलनातील परिसंवादात ‘लिमिटेड ओव्हर्स’ची जुनी नाटके आणणाऱ्या सुनील बर्वे आणि नीलम शिर्के या दोन प्रमुख निर्मात्यांनी गैरहजेरी लावल्याने चर्चेतली हवाच काढून घेतली गेली. मग उर्वरित दुसऱ्या फळीतील फलंदाजांनी आपल्या परीने आपली बाजू मांडत हा सामना अनिर्णीत ठेवला. या सत्राचे सूत्रसंचालक सुरेश खरे यांनी सहभागी वक्तयांची मत – मतांतरे जाणून घेण्याचे काम चोख पार पाडले. तथापि त्यांनीही कुणाच्या पारडय़ात आपले दान टाकले नाही.
‘नाटय़संपदा’चे निर्माते अनंत पणशीकर यांनी ‘आर्थिक यशाची हमी’ या कारणास्तव आपण जुन्या नाटकांची निर्मिती करीत असल्याचे साफ नाकारले. माझ्या घडणीच्या काळात ज्या संगीत नाटकांनी मला आनंद दिला ती नाटके करावीत, या उद्देशाने आणि आपल्या पोर्टफोलियोमध्ये चांगल्या नाटकांचा समावेश असावा म्हणून आपण ‘लग्नाची बेडी’, ‘वाऱ्यावरची वरात’ आणि ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकांची निर्मिती केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जुन्या नाटकांच्या निर्मितीत यशाची हमी असते, ही समजूत चुकीची आहे, हे नीलम शिर्के यांनी काढलेल्या, जुन्या नाटकांची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी पाहता लक्षात येईल,’ असे ते म्हणाले. मी ‘लग्नाची बेडी’ काढताना मात्र त्यात व्यावसायिक विचार अंतर्भूत होता, हे त्यांनी मान्य केले.
एकेकाळी गाजलेली आणि एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचलेली नाटके पुनरुज्जीवित करताना ती त्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, असा आक्षेप घेत निर्माते उदय धुरत यांनी जुन्या नाटकांच्या निर्मितीमागे केवळ आर्थिक यशाची हमी हेच एकमेव कारण असल्याचे ठासून सांगितले. जे जुने निर्माते अशी नाटके काढत आहेत, त्यांच्यावरही धुरत यांनी टीका केली. तुम्हाला जर नव्या, चांगल्या संहिता मिळत नसतील तर नाटक काढू नका; थांबा, असा सल्लाही त्यांनी दिला.
तथापि, अनंत पणशीकर यांनी धुरत यांचे हे विधान खोडून काढले. ते म्हणाले,‘‘ आमच्या पुनरुज्जीवित नाटकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही अस्सल सोने विकतो. सोन्याचा मुलामा दिलेले काही विकत नाही.’’
जुन्या नाटकांच्या पुनरुज्जीवनात या नाटकांचे वर्तमानाशी काय नाते आहे हे तपासण्याचा हेतू नसतो, अशी खंत व्यक्त करून शफी नायकवडी पुढे म्हणाले की, ९० च्या दशकात पुढे सरकलेले मराठी नाटक पुन्हा दोन पावले मागे जाते आहे की काय, असा प्रश्न पडतो. मर्यादित प्रयोगाची टूम ही व्यावसायिक चलाखी असल्याचा दावा त्यांनी केला.
ही चर्चा व्यावसायिक रंगभूमीपुरतीच मर्यादित होत असल्याची जाणीव करून देत शेखर बेंद्रे यांनी, हौशी रंगभूमीवरही ‘आर्थिक यशाची हमी’ हा निकष नसला तरी बक्षीस मिळविण्याची ईष्र्या त्यांच्यातही असतेच, असे ते म्हणाले.
जुन्या नाटकांच्या निर्मितीत कमी धोका असला तरी धोका नसतोच असे नाही. आणि पूर्वी एखादे नाटक खूप गाजले, विशिष्ट उंचीवर गेले होते म्हणून नवीन मंडळींनी ते करूच नये असे नाही. अण्णासाहेब किलरेस्करांचे नाटक एकाच वेळी तीन तीन संस्था करत होत्या, असा दाखला भरत नाटय़ संशोधन मंदिराचे रवींद्र खरे यांनी दिला. कुठल्याही कारणाने का होईना, जुन्या नाटकांची निर्मिती होत आहे; त्यामुळे आपला समृद्ध नाटय़वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे, याबद्दल खरे यांनी समाधान व्यक्त केले.
चर्चेचे अध्यक्ष सुरेश खरे यांनी,‘‘ज्यांच्यामुळे हा परिसंवाद घेण्याची वेळ आली तीच मंडळी या परिसंवादाला हजर नसल्याने आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, याबद्दल खेद व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Main producer of drama is absent in debate of old drama of limited over