Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment distribution Started : महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल आहेत. आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सन्मान निधी देण्यात आला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण २९ सप्टेंबर रोजी केलं जाईल असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज या योजनेतील पैशांचं वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा झाले आहेत. पैशांच्या वितरणाची प्रक्रिया चालू झाली असून काहीच वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
आदिती तटकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी ३४,७४,११६ भगिनींना ५२१ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हफ्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.
हे ही वाचा >> Vijay Wadettiwar : “शाळांमध्ये गौतम अदाणींचा फोटो लावायची तयारी सुरू”, राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची टीका
‘या’ महिलांना वाट पाहावी लागणार
ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही, किंवा अर्ज भरताना चुका केल्या होत्या त्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्याचबरोबर बँक खातं व आधार क्रमांक लिंक न केलेल्या महिलांनाही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागेल. बँक खातं आधार क्रमाकांशी लिंक करावं लागेल. त्याशिवाय या योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. राज्य सरकारने महिलांना आवाहन केलं आहे की लवकरात लवकर बँकेत जाऊन बँक खातं आधारशी लिंक करून घ्यावं. लाडकी बहीण योजनेसाठी सरकार अजूनही अर्ज स्वीकारत आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
© IE Online Media Services (P) Ltd