राजापुर : राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीला रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामध्ये आगीचा जोरदार भडका उडाल्याने आग विझविण्याचे ग्रामस्थांनी आटोकात प्रयत्न केले. त्यानंतर, राजापूर नगर पालिकेचा अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला.
सुमारे पाच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आण्यात सार्यांना यश आले आहे. या आग लागलेल्या इमारतीसह त्यामध्ये असलेली सात दुकाने आणि त्यामध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नाटे बाजारपेठेमध्ये धाऊलवल्ली येथील राजेश पावसकर यांच्या मालकीची इमारत असून या इमारतीमध्ये व्यवसायिकांची विविध प्रकारची सात दुकाने आहेत. या इमारतीला रात्री आग लागल्याचे या परिसरातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. काही मिनिटांमध्ये आगीचा मोठा भडका उडताना आगीच्या मोठमोठ्या ज्वाला निर्माण झाल्या. आगीची माहिती कर्णोपकर्णी होताच साखरीनाटे व नाटे येथील ग्रामस्थ, तरूण यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्रीच्यावेळी स्वतःच्या वाहनांतून पाणी आणत ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
दरम्यान, सागरी पोलीस स्टेशन नाटेचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर, अमलदार व पोलीस कर्मचारी, नाटे सरपंच संदीप बांदकर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शर्थीच्या प्रयत्नांनतरही आग आटोक्यात येत नव्हती. दरम्यान, राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफेही माहिती मिळताच रात्रीच्यावेळी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राजापूर नगर पालिकेशी संपर्क साधून पालिकेचा अग्नीशन बंब मागविला. रात्री २.३० वा. च्या सुमारास अग्नीशमन बंब दाखल झाला. त्यानंतर, त्याच्या सहाय्याने सुमारे पाच तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत या इमारतीमध्ये असलेली सात दुकाने आणि त्यामध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीमधील दिगंबर गिजम यांच्या उपहारगृहातील संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा आणि साहित्य जळून नुकसान झाले आहे. तर, भीम खंडी यांचे चायनीज फास्ट फूड सेंटर जळून, प्रदीप मयेकर यांच्या टेलरिंग शॉपमधील मशीन्स, तयार कपडे, केदार ठाकूर यांचे कापड व प्लास्टिक वस्तू विक्री दुकान, प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडून कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक, निकिता गोसावी यांचे ब्युटी पार्लर, नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्यांचे गोडाऊन जळून खाक झाले आहे. या आगीत अंदाजे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.