जिल्ह्यातील चारही मतदारसंघात राष्ट्रवादीने दणदणीत मते मिळवली. मतदारांनी प्रामुख्याने राष्ट्रवादीलाच अधिक पसंती दिली. राष्ट्रवादीच्या ४ उमेदवारांच्या पारडय़ात २ लाख २३ हजार मते मतदारांनी टाकली. याउलट काँग्रेसवर मात्र नामुष्कीची वेळ आली. परभणी, गंगाखेड या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारांना नगण्य मते मिळाली. सुरेश वरपुडकर, रामप्रसाद बोर्डीकर यांना चांगली मते मिळाली असली, तरी काँग्रेसपेक्षाही या नेत्यांचा त्यांच्या मतदारसंघात असलेला संपर्क हे त्याचे कारण आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने त्यांना आपापले मतांचे राजकीय भांडवल कळाले.
चारही प्रमुख पक्षांची मते पाहिल्यास राष्ट्रवादीने सर्वाधिक मते मिळवल्याचे दिसते. यापाठोपाठ शिवसेनेने १ लाख ५५ हजार ८९९ मते, तर काँग्रेसने १ लाख ४७ हजार ८८६ मते घेतली. परभणी व जिंतूर या दोन जागा भाजपने लढवल्या. या दोनच ठिकाणी मतदारांसमोर ‘कमळ’ चिन्ह होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाथरीत, तर गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीच्या वतीने निवडणूक लढविली. भाजपसह महायुतीला जिल्ह्यात १ लाख ३० हजार ८८७ मते मिळाली.
जिंतूर, गंगाखेड येथे राष्ट्रवादीने विजय मिळवला. जिंतूरमध्ये विजय भांबळे यांना १ लाख ६ हजार ९१२, तर गंगाखेडमध्ये डॉ. मधुसूदन केंद्रे यांना ५८ हजार ४१५ मते मिळाली. परभणीत महापौर प्रताप देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली; पण येथे घडय़ाळाचा गजर घुमला नाही. परभणी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. भाजपच्या मतविभागणीतही सेनेने तो कायम ठेवला. शिवसेनेपाठोपाठ ‘एमआयएम’ने मते घेतली, तर भाजपचे आनंद भरोसे यांनी या मतदारसंघात ४२ हजार ५१ मते घेऊन जोरदार लढत दिली. ऐनवेळी पक्षाची उमेदवारी मिळूनही त्यांनी चांगले मतदान घेतले. त्या तुलनेत राष्ट्रवादीच्या ताब्यात महापालिका व पक्षाचे नगरसेवक मोठय़ा संख्येने असूनही उमेदवार देशमुख यांच्या पारडय़ात केवळ ११ हजार ३७५ मते पडली. पाथरीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांना ४६ हजार ३०२ मते मिळाली. भांबळे, केंद्रे, देशमुख, बाबाजानी या चौघांची मिळून २ लाख २३ हजार मते होतात.
राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली. पंजा चिन्हावर ऐनवेळी आलेले सुरेश वरपुडकर पराभूत झाले व काँग्रेसचे जिंतूरचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचेही पानीपत झाले. या दोन दिग्गजांचा पराभव झाला. परभणी व गंगाखेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी खूपच किरकोळ मते घेतली. वस्तुत या दोन्ही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही चांगली मते घेतली; पण काँग्रेस उमेदवारांना मतदारांनी साफ झिडकारले. परभणीत इरफानूर रहेमान खान यांना केवळ ७ हजार ३४२, तर गंगाखेडमध्ये बाळ चौधरी यांना केवळ ५ हजार ३५८ मते मिळाली.
परभणी जिल्हा लोकसभेला नेहमीच शिवसेनेच्या बाजूने असतो. स्वबळावर लढल्याने शिवसेनेला चारही ठिकाणी उमेदवार द्यावे लागले. परभणीत डॉ. राहुल पाटील यांनी विजय मिळवताना ७१ हजार ५८४ मते घेतली. शेवटच्या टप्प्यात सेनेचा विजय होणार हे जवळपास निश्चित होते; पण मतांचा आकडा एवढा मोठा असेल, अशी शक्यता नव्हती. परभणीत शिवसेनेने आपल्या पारंपरिक मतांपेक्षाही अन्य मते मिळवली. जी मते कधीच ‘धनुष्यबाणा’कडे वळत नाहीत, अशीही मते या वेळी सेनेला मिळाली. परभणीत शिवसेनेने मोठे यश संपादन केले. मात्र अन्य मतदारसंघात शिवसेनेला आपला प्रभाव टाकता आला नाही.
गंगाखेड मतदारसंघात डॉ. शिवाजी दळणर हे राष्ट्रवादीच्या डॉ. मधुसूदन केंद्रे यांना चांगली लढत देतील, असे वाटले होते. पण डॉ. दळणर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. ४१ हजार ९१५ मते मिळवून त्यांनी चौथा क्रमांक मिळवला.
पाथरीत आमदार मीरा रेंगे यांना जागा राखता आली नाही, हा सेनेच्या दृष्टीने मोठा पराभव आहे. ३५ हजार ४०८ मते मिळवून रेंगे चौथ्या क्रमांकावर राहिल्या. जिंतूरमध्ये ऐनवेळी पक्षाने उमेदवारी दिलेले राम पाटीलही निष्प्रभ ठरले. पाटील यांना केवळ ६ हजार ९९२ मते मिळाली.
भाजपने परभणीत चांगले मतदान घेतले. मात्र, महायुतीतील अन्य घटक असलेल्या रासपच्या रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडमध्ये ५६ हजार १२६ मते मिळवली. पाथरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विजय सिताफळे यांना केवळ २ हजार ४०० मते मिळाली. जिंतूरमध्ये भाजपने संजय साडेगावकर या सेनेतून ऐनवेळी आलेल्या कार्यकर्त्यांस उमेदवारी दिली. साडेगावकर यांनी या मतदारसंघात ३० हजार ३१० मते घेतली.
जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप हे सगळेच पक्ष स्वबळावर लढले. त्यामुळे कोणी कोणाला पाडले, असे म्हणायची सोय राहिली नाही आणि कोणी आघाडी अथवा महायुतीचा धर्म पाळला नाही, असे म्हणत एकमेकांवर खापर फोडण्याचीही संधी शिल्लक उरली नाही.