रत्नागिरी – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर परिसरात शनिवार व रविवारी अशा सलग दोन्ही दिवशी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. सोनवी पुलाच्या रखडलेल्या कामामुळे महामार्गावर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे तासनतास हाल झाले.
सलग तीन दिवसांची सुट्टी आल्याने पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले आहेत. दापोली, हर्णे, गुहागर, गणपतीपुळे, पावस आदी पर्यटनस्थळे गजबजली असतानाच, संगमेश्वर येथील महामार्गावरील कोंडीमुळे पर्यटकांचा वेळ आणि संयम दोन्ही पणाला लागले.
सोनवी पुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथगतीने सुरू असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. महामार्गाच्या कामांसाठी केलेल्या अपुऱ्या नियोजनाचा फटका स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही बसत असल्याचा आरोप होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र होते.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांच्या ठिकाणी अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
महामार्गाची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास येत्या काळात वाहतूक कोंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.
