कराड : श्री क्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील प्रसिध्द पुरातण श्रीराम मंदिरात आज बुधवारी सीतामाईच्या चरणी पारंपारिक वेशभूषेतील सुहासिनींनी अपूर्वाईने ओवसा अन् विडा घेत, अखंड सौभाग्याचं लेणं मागितलं. दरवर्षी नववधूंची पडणारी भर यामुळे यात्रेस गर्दी वाढतच असल्याचे दिसून आले.
मकर संक्रांतीच्या सणाला प्रथेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या आणि सुहासिनींसाठी अप्रूप ठरणाऱ्या सीतामाई यात्रेसाठी चाफळच्या श्रीराम मंदिर परिसरात सकाळपासूनच युवती व महिलांनी गर्दी केली होती. मकर संक्रातीच्या सणाला श्री सीतामाई चरणी अखंड सौभाग्याचा वसा घेतल्यास तो फलश्रुतीस जातो अशी महिलावर्गाची दृढ श्रध्दा आहे.
सूर्यनारायण डोईवर येताच, भरदुपारी मंदिर परिसरात सुहासिनींनी खाऊच्या पानांचे विडे मांडून मनोभावे पूजा करत ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’, ‘वसा घ्या वसा, वसा घ्यायचा कसा? मी सांगते तसा’ अशा स्नेहभावाने एकमेकींना ओवसा अन् विडा यासह आलिंगन दिले.
सुवर्णालंकार, भरजरी साडी, केसात फुलांनी माळलेले सुगंधी गजरे, भांगात गुलाल असा साज शृंगार केलेल्या सुहासिनींची ओवसा घेण्यासाठी आज लगबग राहिली होती. एका सुवासिनींनी सीतामाईस ओवळल्यानंतर दुसऱ्या सुवासिनीने ओवसले. खाऊच्या पानावर खोबरे, खारीक, बदाम, सुपारी, हळदी- कुंकू ठेवून पाच सौभाग्यवतींच्या हातून ओट्यात घातल्या गेल्या. मंदिर परिसरातील पूजेमुळे सुगड्यांसह तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, पावटा, गव्हाच्या लोंब्या, शेंगा, हरभरा, बिबी, घेवडा यांचा खच, तर हळदी- कुंकवाचा सडा पसरला होता.
सीतामाईचे दर्शन शिस्तीने घेता यावे यासाठी देवस्थान न्यासाध्यक्ष सुभाषराव जोशी, विश्वस्त अमरसिंह पाटणकर, दिलीप पाठक, व्यवस्थापक अरुण गायकवाड, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, तहसीलदार अनंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नारळीची बाग व मंदिर परीसरात वाहनतळ करण्यात आले होते. सीतामाईच्या दर्शनासाठी श्रीराम देवस्थान न्यासाने दर्शनरांग, पाण्याची व्यवस्था, वाहनतळ याचे उत्तम नियोजन केले होते. यात्रेत खेळणी, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनांची दालने, झोपाळे गर्दीने फुलले होते. भाविकांसाठी ज्यादाच्या बसगाड्यांची सोयही होती. देवस्थान न्यासाचे विश्वस्त, व्यवस्थापक, आजी- माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सेवेतून यात्रा उत्साहात पार पडली.
