तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. ते त्यांच्या धडाडीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. तुकाराम मुंढे यांनी लहान मुलांना जंक फूड दिलं जाऊ नये या उद्देशाने तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमावलीनुसार शाळा किंवा शाळेच्या ५० मीटर अंतरातील वर्तुळात वडा-पाव, समोसा, बर्गर अशा प्रकारचं जंक फूड विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र तुकाराम मुंढेंना अभिनेते मकरंद अनासपुरेंच्या मुलाने सर, वडा-पाव शाळेत मिळायला हवा म्हणत जेव्हा तुकाराम मुंढेंकडे मागणी केली तेव्हा तुकाराम मुंढेंनी दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे. एवढंच नाही तर चायनीजही खाऊ नका, त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडतं असंही त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

इंद्रनील अनासपुरेला तुकाराम मुंढेंना काय सांगितलं?

इंद्रनील अनासपुरे हा मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा मुलगा आहे, तो तुकाराम मुंढे यांना म्हणाला, सर तुमचा शाळेमध्ये खूप टेरर आहे. पण मला माझ्या मित्रांनी एक प्रश्न विचारायला सांगितला आहे तो मी तुम्हाला विचारतोय. माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी शाळेत वडा-पाव कधी मिळेल तुम्ही तो बंद केलाय, तो सुरू करा असं ते म्हणत आहेत. इंद्रनीलच्या या प्रश्नावर तुकाराम मुंढे म्हणाले, “वडा-पावमुळे आपलं आयुष्य काही चांगलं होणार नाही. आपण चांगलं खाल्लं तर शरीरासाठी ते चांगलं असेल. मी तर सांगेन की तुम्ही मुलांनी प्रोटीनयुक्त अन्न खाल्लं पाहिजे. तेलकट आणि फॅटी असं खाऊ नका. चायनीजही खाऊ नका, त्यात असलेले जे कलर्स असतात त्यात रसायनं असतात. चविष्ट काहीही खाण्याऐवजी जे आरोग्याला अपाय करणार नाही असं अन्न खा” असं उत्तर तुकाराम मुंढेंनी इंद्रनील अनासपुरेला दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हेही वाचा
तुकाराम मुंढेंचं वक्तव्य; “माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो”

इंद्रनील अनासपुरेच्या व्हिडीओ वर विविध प्रतिक्रिया

इंद्रनील अनासपुरेनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. तो म्हणाला तुकाराम मुंढेंनी उत्तर दिलंय की वडा-पाव खाण्यापेक्षा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि ते सुधारा. पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही तुमची बॉडी चांगली बनवू शकता. तसंच या व्हिडीओवर पोस्टही येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की शाळेत वडा-पाव विक्री सुरू करण्यापेक्षा घरी आईला वडा तयार करायला सांग. दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे तुकाराम सर तुम्ही जे लहान मुलांना समजावून सांगत आहात त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट आहे. आपण काय खातो आहे आणि काय खाल्लं पाहिजे यासाठी एक चांगली शिस्त तुम्ही लावली आहे. आपल्या देशाला अशा प्रामाणिक अधिकऱ्यांची खूप गरज आहे. तुकाराम मुंढे हे कायमच जनतेच्या हिताचे निर्णय घेतात असं म्हणत आणखी एका युजरने कमेंट केली आहे.