टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणे चुकीचे नसल्याचा दावा मालेगावचे उपमहापौर शान ए हिंद यांनी केला आहे. मालेगाव उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी एका कार्यक्रमात दिली. सध्या उपमहापौर दालनात दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असेही शान ए हिंद यांनी स्पष्ट केले. कार्यालयात हा फोटो लावण्यास कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान यांच्या नावावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. काल (१५ फेब्रुवारी) पुण्यात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आमनेसामने संघर्ष झाला. या वेळी सौम्य दगडफेकही झाली, ज्यामध्ये काही कार्यकर्ते आणि पत्रकार जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले असून, टिपू सुलतान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?

राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धीन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले होते, “छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य महान असून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे पराक्रमी योद्धे होते. त्यांनी कधीही विषारी किंवा विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे प्रतीक म्हणून टिपू सुलतान यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे.”

नेमकं काय घडले होते?

मालेगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या खुर्चीचा ताबा घेतला खरा, मात्र पदभार स्वीकारताच शहरात एका नवीन वादाला तोंड फुटले होते. उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा एक फोटो कार्यालयात लावल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्या होत्या. यावरून मालेगाव शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर टिपू सुलतान यांचा हा फोटो कार्यालयातून काढून टाकण्यात आला.

मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यावरून सुरू झालेला वाद शमला असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उडी घेतल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला होता. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सपकाळ यांच्या विधानाचा निषेध म्हणून मालेगावात भाजपने रविवारी दुपारी आक्रमक पवित्रा घेत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले होते.