रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन आणि जैवविविधतेला नवे बळ देणारा मालगुंड येथील भव्य प्राणी संग्रहालय प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे. सुमारे १६० कोटी २७ लाख ६७ हजार ७०८ रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ अंतर्गत त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

प्रकल्पासाठी मालगुंड येथे सुमारे २५.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून जमीनमालकांना सुमारे ४.२८ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. सध्या जागेच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंतीचे काम सुरू असून त्यासाठी २१.७३ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी ७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

एकूण प्रकल्पासाठी सुमारे १६० कोटी २८ लाख रुपयांचा निधी नियोजित करण्यात आला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून ६०.७५ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली असून उर्वरित निधी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’तून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

प्रकल्पासाठी ‘अरफाक अहमद कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नागपूर’ यांची वास्तुविशारद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मालगुंडसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळी प्राणीसंग्रहालय उभारल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हा प्रकल्प उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून लवकरच त्यासंदर्भात आढावा बैठक होणार आहे. प्रारंभी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.