scorecardresearch

शोधमोहीम पूर्ण; १५१ मृतदेह हाती

माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.

शोधमोहीम पूर्ण; १५१ मृतदेह हाती

माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली. दुर्घटनेत अडकलेल्या १६० लोकांपैकी १५१ मृतदेह हाती लागले असून, नऊ जण जखमी अवस्थेत मिळाले आहेत. बुधवारी दिवसभराच्या शोधानंतर एकही नवीन मृतदेह मिळाला नाही. सापडलेल्या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी करण्याचा निर्णय माळीण येथील बठकीत घेण्यात आला. तर दशक्रियेनंतर तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी निवासाचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
मुसळधार पाऊस, चिखलाची दलदल, दरुगधीचा त्रास सहन करीत तसेच, व्ही.आय.पी. व्यक्ती व बघ्यांचा वारंवार होणारा अडथळा सहन करीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी दिवस-रात्र काम करून माळीण गावातील मातीचे ढिगारे उपसले. हे काम पूर्ण झाल्यानंतर या जवानांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. काम शंभर टक्के पूर्ण केल्याचे समाधान असले, तरीही या दुर्घटनेचे दु:ख कायम मनात राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे प्रमुख आलोक अवस्थी यांनी दिली. काम संपल्यानंतर या दलाचे जवान आज माघारी जाणार आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-08-2014 at 03:02 IST

संबंधित बातम्या