अहिल्यानगर: शहरातील ऐतिहासिक माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचालींना आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेना (शिंदे गट) गटनेते दत्तात्रय कावरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत हे आव्हान दिले आहे. कावरे माळीवाडा वेस भागातीलच नगरसेवक आहेत. याचिकेत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, पुरातत्व विभागासह महापौरांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.
शहर रचनेचा पुरावा असलेली माळीवाडा वेस सुमारे ४०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तू आहे. तिचे जतन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना उलट ती पाडण्यासाठी प्रशासनच पुढाकार घेत आहे. सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेने जाहीर सूचना प्रसिद्ध करून हरकती मागवल्या होत्या. या विरोधात मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या. नितीन भुतारे यांच्यासह वेस परिसरातील व्यापाऱ्यांनीही याला विरोध केला. त्यामुळे प्रशासनाला निर्णय रद्द करावा लागला.
त्यानंतरही हा विषय पुन्हा पुढे आणण्यात आला आहे. माळीवाडा वेस ऐतिहासिक असल्याचे पुरातत्त्व विभागाचे पत्र, चारशे वर्षांचा इतिहास, तसेच यापूर्वी नागरिकांनी दाखल केलेल्या सुमारे २ हजार हरकतींचा तपशीलही न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात ॲड. नारायण नरवडे हे बाजू मांडत आहेत.
दरम्यान, माळीवाडा वेस पाडण्यासाठी ५६ नगरसेवकांच्या मागणीचे पत्र महापौरांना देण्यात आले आहे. या पत्रानुसार आगामी महासभेत माळीवाडा वेस पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार पुरातत्व विभाग, वाहतूक शाखा आदींची ना हरकत प्रमाणपत्रे मनपाकडून गोळा केली जात आहेत. मात्र, या प्रकरणी जनहित याचिका दाखल झाल्यामुळे माळीवाडा वेस पाडण्यात महासभेचा ठराव करणे अडचणीचे ठरणार आहे. या माळीवाडा 20 च्या जागेवर महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा उभारण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे त्यासाठी ही ऐतिहासिक वास्तू हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगर शहराच्या संरक्षणासाठी १६३१ मध्ये तटबंदीच्या स्वरूपात शहरात एकूण ११ वेशी उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी माळीवाडा वेस एक आहे. आजमितीला शहरात माळीवाडा वेस व दिल्ली दरवाजा वेळस अशा दोनच वास्तू सध्या टिकून आहेत. यातील दिल्ली दरवाजा वेस ही वास्तू हटवण्याचे प्रयत्न महापालिकेने पूर्वी प्रयत्न केले होते. नागरिकांच्या विरोधामुळे हे प्रयत्न बासनात गुंडाळावे लागले.
अहिल्यानगर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेली माळीवाडा वेस पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ही वेस वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माळीवाडा वेस ही सुमारे ४०० वर्षांपूर्वीची आहे. ही वेस तटबंदीचे उदाहरण असून त्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे ही वेस पाडण्याची कार्यवाही रोखावी व या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे, असे पत्र पुरातत्वशास्त्र अधीक्षकांना पाठवले आहे.
