​सावंतवाडी: मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात मासेमारी करत असताना लाटांच्या तडाख्याने मासेमारी नौका पलटी होऊन दोन मच्छिमारांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मालवण दांडी येथील नौका मालक तथा मच्छिमार नेते सन्मेष सुरेश परब आणि अक्षय हनुमंत राणे अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग सन्मेष परब याला सुखरूप वाचविण्यात यश आले आहे. मच्छिमारी हंगामाच्या प्रारंभीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण किनारपट्टीवर शोककळा पसरली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सन्मेष परब यांनी समुद्रात मासेमारीसाठी जाळी मारून ठेवली होती. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते मुलगा सुयोग आणि खलाशी अक्षय राणे यांच्यासह नौकेतून दांडी समोरील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील भागात जाळी काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, किल्ल्यामागील खडकाळ भागात समुद्रात मोठ्या लाटा मोडत होत्या. एका जोरदार लाटेच्या तडाख्यात त्यांची नौका समुद्रात पलटी झाली आणि तिघेही पाण्यात फेकले गेले.

स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आलेल्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने सन्मेष परब व अक्षय राणे हे समुद्रात बेपत्ता झाले. तर सुयोग परब याने नौकेतील डब्यांचा आधार घेतल्याने तो पाण्यात तरंगत राहिला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमारांनी समुद्रात धाव घेतली. जयदेव लोणे यांच्या नौकेच्या मदतीने सुयोग परब याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही वेळेनंतर सन्मेष परब व अक्षय राणे यांचे मृतदेह समुद्रात आढळून आल्यावर ते किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

​घटनेची माहिती मिळताच दांडीसह मालवण किनारपट्टीवरील मच्छिमारांनी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. पारंपारिक मच्छिमारांच्या हक्काच्या लढ्यात, विविध आंदोलनांत व उपोषणांत सन्मेष परब हे नेहमी अग्रणी आणि सक्रिय असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने मच्छिमार समाजात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.