सावंतवाडी : मालवण तालुक्यातील देवळी (खालची) येथील विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर १२ एप्रिल रोजी आकाशातून ५ किलो वजनाचा बर्फाचा गोळा पडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा बर्फाचा गोळा म्हणजे ‘मेगाक्रायोमेटोर’ (Megacryometeor) असून, ही एक दुर्मिळ हवामानशास्त्रीय स्थिती असल्याचे मत भूगर्भ व पर्यावरण अभ्यासक प्रा. हसन खान यांनी व्यक्त केले आहे.
प्रा. हसन खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेगाक्रायोमिटिओर’ म्हणजे आकाशातून पडणारा बर्फाचा मोठा गोळा. जेव्हा वातावरणातील शुद्ध बाष्पापासून बर्फ तयार होतो आणि तो गोळा अत्यंत वेगाने खाली येतो, तेव्हा त्याला हे नाव दिले जाते. ही घटना सामान्य पावसाच्या गारांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
सध्याच्या हवामान बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह आणि पूर्व जेट प्रवाह एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. या प्रवाहांच्या संयोगातून हवेतील बाष्प गोठून तयार झालेला हा ५ किलोचा बर्फाचा गोळा देऊळकर यांच्या घरावर पडला. या घटनेत घराच्या छपराचे अंशतः नुकसान झाले असले तरी, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवामान बदलाचा परिणाम:
प्रा. खान यांच्या मते, या दुर्मिळ घटनेमागे जागतिक हवामान बदल कारणीभूत आहेत. वातावरणातील आर्द्रता, जेट प्रवाहांची गती आणि तापमानातील अचानक होणारे बदल यामुळे अशा मोठ्या बर्फाच्या गोळ्यांची निर्मिती होते. हा प्रकार नैसर्गिक असला तरी, निसर्गाचे बदललेले स्वरूप मानवासाठी एक धोक्याची सूचना आहे, असेही त्यांनी नमूद केले.
स्थानिक पातळीवर ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, प्रा. हसन खान यांनी दिलेल्या या शास्त्रीय स्पष्टीकरणामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.
