सावंतवाडी: मालवणमधील एका हॉटेल व्यावसायिकाला “हॉटेलमध्ये गाणी लावून कॉपीराईटचा भंग केला” असा ठपका ठेवत ५० लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. या विचित्र आणि मोठ्या रकमेच्या मागणीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हा व्यापारी महासंघाने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे म्हटले आहे.
संबंधित हॉटेल व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी एक पत्र प्राप्त झाले होते. त्यात असा दावा करण्यात आला होता की, हॉटेलमध्ये स्पीकरवर वाजवली जाणारी गाणी ‘फोनोग्राफीक परफॉर्मन्स लिमिटेड मुंबई’ या संस्थेच्या मालकीची आहेत. परवानगीशिवाय ही गाणी लावल्यामुळे नियमांचा भंग झाला असून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर, एका महिला वकिलाच्या नावे थेट ५० लाख रुपयांची नोटीस व्यावसायिकाला धाडण्यात आली.
व्यापारी महासंघाचा सतर्कतेचा इशारा
या प्रकारानंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने जिल्हा व्यापारी महासंघाशी संपर्क साधला. जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ते म्हणाले,अशा प्रकारच्या नोटीसांना कोणताही ठोस कायदेशीर आधार नसून ही निव्वळ आर्थिक लुबाडणूक करण्याची पद्धत आहे. या नोटीसीला उत्तर दिल्यास किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होणे किंवा बँक खात्यातून पैसे चोरीला जाण्याचे प्रकार घडू शकतात. कोणत्याही व्यावसायिकाला अशा प्रकारची नोटीस किंवा पत्र आल्यास त्यांनी घाबरून न जाता तातडीने व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
”हा प्रकार फसवणुकीचा आणि व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही व्यावसायिकाने अशा नोटिसीला उत्तर देऊ नये.” असे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी स्पष्ट केले आहे.
