सावंतवाडी : मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशाचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून, यावरून तळाशील आणि रेवंडी ग्रामस्थांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून तळाशीलच्या ग्रामस्थांनी खाडीपात्रात होड्यांद्वारे उतरून अचानक आंदोलन सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून मालवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.

​रेवंडी जेटीसमोरील खाडीपात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असून, यामुळे तळाशील गावाला धोका निर्माण होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात तळाशील ग्रामस्थांनी यापूर्वीच तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. दुसरीकडे, या विरोधाचा राग धरून रेवंडी ग्रामस्थांनी तळाशीलच्या मच्छिमारांना जेटीवर मासे वाहतूक करण्यास व वाहने लावण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

​या वादावर मार्ग काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात दोन्ही बाजूंची एकत्रित बैठक पार पडली होती. मात्र, या चर्चेत कोणताही समझोता होऊ शकला नाही. तहसीलदारांनी दोन्ही गावांना सामोपचाराने तोडगा काढण्याचे सूचित केले होते, परंतु निर्णय न झाल्याने तळाशील ग्रामस्थ आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले.

​खाडीपात्रातच ठिय्या

​शुक्रवारी सायंकाळी तळाशीलमधील महिला व पुरुषांनी ४ ते ५ होड्यांसह कालावल खाडीत कूच केली आणि पात्रातच आंदोलन सुरू केले. ते अजूनही सुरू आहे. हे पाहून रेवंडी ग्रामस्थांनीही जेटीवर गर्दी केली, ज्यामुळे दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडाली. घटनेची गांभीर्य ओळखून मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि बंदर विभागाचे निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी तात्काळ फौजफाट्यासह रेवंडी जेटीवर धाव घेतली.

​पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तळाशील ग्रामस्थांनी आपल्या होड्या खाडीच्या मधोमध नेल्या, मात्र आपले आंदोलन मागे घेतले नाही. उशिरापर्यंत ग्रामस्थ होडीतच बसून वाळू उपशाचा निषेध करत होते. सध्या जेटी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.