सावंतवाडी: महाराष्ट्र सागरी हद्दीत बंदी असलेली एलईडी लाईट पर्ससीन मासेमारी मालवणच्या समुद्रात राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून होत असतानाच, मत्स्य विभागाने सोमवारी रात्री एका अनधिकृत नौकेवर धडक कारवाई केली. रत्नागिरी जिल्ह्यातील नौका जप्त करण्यात आली असून ती सध्या सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे.
मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी या अवैध मासेमारीवरून मत्स्य विभाग आणि मत्स्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “रात्रीच्या वेळी किनाऱ्यावरूनच एलईडी दिव्यांचा लखलखाट दिसतो, तरीही प्रशासन कारवाई करत नाही. केवळ परजिल्ह्यातील नौकांवर कारवाईचा देखावा केला जातो, मात्र स्थानिक अवैध नौकांना सोडून दिले जाते,” असा आरोप जोगी यांनी केला.
तसेच, मत्स्यमंत्री जिल्ह्यातील असूनही मच्छीमारांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक ३० मार्च रोजी रात्री ९ वाजता देवबाग-मालवण समुद्रात गस्त घालत होते. किनाऱ्यापासून साधारण ११ ते १२ सागरी मैल अंतरावर रत्नागिरी येथील महेश मनोहर आयरे यांच्या मालकीची नौका एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करताना आढळली.
पथकाने तातडीने कारवाई करत नौका ताब्यात घेतली. या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार अवैध मासेमारीला चाप लावण्यासाठी विभागाने कठोर पावले उचलली असून, यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असे विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत सागरी सुरक्षा पर्यवेक्षक यांनी सहभाग घेतला.
