सावंतवाडी:: मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन मंगळवारी कमालीचे चिघळले. प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त महिलांनी थेट खाडीपात्रात उड्या घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मंगळवारी रात्री दोन महिलांची प्रकृती खालावली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​गेल्या काही दिवसांपासून तळाशील ग्रामस्थ खाडीपात्रात होड्यांमध्ये बसून आंदोलन करत आहेत. ‘बेकायदेशीर वाळू उपसा कायमचा बंद करा’ आणि ‘दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा’ या प्रमुख मागण्यांसाठी महिलांनी मंगळवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार आणि पोलीस अधिकारी चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा घडवून आणण्यात आली, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्याने आणि केवळ बैठकीचे गाजर दाखवल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला.

​”कालावल खाडीत रेवंडी जेटीजवळ उभ्या असलेल्या अवैध वाळूच्या बोटींवर कारवाई करण्यास बंदर निरीक्षक टाळाटाळ करत आहेत. महसूल विभागाला ते सहकार्य करत नसून, त्यांच्या वेळकाढूपणामुळेच माफियांच्या बोटी पळवून नेण्यात आल्या,” असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. या अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

​थेट पाण्यात उड्या; महिलांची प्रकृती चिंताजनक

​मंगळवारी सायंकाळी अधिकाऱ्यांच्या देखत महिलांनी ‘प्रशासन मुर्दाबाद’च्या घोषणा देत खाडीपात्रात धाव घेतली. भरपाण्यात उतरून आंदोलन करत असताना मंगळवारी रात्री रजनी मायबा आणि चंद्रलेखा चंद्रकांत सादये (५६) या दोन महिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने आचरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. चंद्रलेखा सादये यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालवण येथे हलवण्यात आले आहे.

​प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह

​”आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, तरीही प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. महिलांनी पाण्यात उतरण्याचा इशारा देऊनही आंदोलनस्थळी महिला पोलीस कर्मचारी किंवा साधी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली नव्हती,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

​या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, संतोष कोदे, विजय कदम यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत महिलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आज बुधवारीही तळाशीलमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली असून, वाळू लिलाव कायमचे बंद होईपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.