Complete guide on Malvan tourist places and best time to visit : उन्हाळ्याच्या सुट्टीत मालवणात पर्यटकांचा ओघ वाढतो. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक मालवणमधील अथांग समुद्र अनुभवण्याकरता येत असतात. मालवणला महाराष्ट्रातील मॉरिशस म्हटलं जातं. कारण मालवण बीच, देवबाग संगम, तारकर्ली बीच, चिवला बीचसारखे समुद्रकिनारा मालवणला लाभला आहे. निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि मालवणी जेवणाची मेजवानी असलेल्या मालवणला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. जर तुम्ही मालवणला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर कोणत्या ठिकाणांना प्राधान्य द्यावे, याची यादी खालीलप्रमाणे आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे

सिंधुदुर्ग किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला हा अभेद्य जलदुर्ग आहे. येथे महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांचे जतन केले आहे. बोटीने येथे जावे लागते.

शिवराजेश्वर मंदिर: सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतच महाराजांचे एक सुंदर मंदिर आहे.

रॉक गार्डन: मालवण शहराच्या जवळच समुद्राकाठी खडकांवर हे सुंदर उद्यान आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे खूप छान दृश्य दिसते.

जय गणेश मंदिर: हे मालवणमधील एक प्रसिद्ध आणि जागृत मंदिर असून त्याची मूर्ती शुद्ध सोन्याची आहे.

समुद्रकिनारे आणि निसर्ग

मालवण बीच: हे मुख्य शहरानजीकचा किनारा असून येथून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मिळतात.

तारकर्ली बीच: इथली पांढरी वाळू आणि उंच माडाची झाडे पर्यटकांना भुरळ घालतात.

देवबाग संगम: जिथे कर्ली नदी समुद्राला मिळते, ते विलोभनीय ठिकाण.

चिवला बीच : हा अर्धवर्तुळाकार आणि शांत समुद्रकिनारा आहे, जिथे निवांत वेळ घालवता येतो.

वॉटर स्पोर्ट्स

स्कूबा डायव्हिंग (Scuba Diving): मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आसपास असलेल्या खडकांपाशी रंगीबेरंगी मासे आणि कोरल पाहण्यासाठी स्कूबा डायव्हिंग सर्वोत्तम आहे.

त्सुनामी आयलंड: येथे पॅरासेलिंग, जेट स्की आणि बनाना राईड यांसारख्या सर्व वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

कसे जाल?

रेल्वे: जवळची रेल्वे स्टेशन्स कणकवली, कुडाळ किंवा सिंधुदुर्ग (ओरोस) आहेत.

रस्ता: मुंबई किंवा पुण्याहून खासगी बसेस किंवा एसटीने मालवणपर्यंत पोहोचता येते आणि तिथून रिक्षा किंवा बसने तारकर्ली/देवबागला जाता येते.

मालवणला गेल्यावर अस्सल मालवणी थाळी, ताजी मासे फ्राय आणि सोळकढी यांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. तसेच शाकाहारी लोकांसाठी घावणे हा पदार्थ नक्की ट्राय करा.