नगर: श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव ग्रामपंचायत पंच मंडळाने सन २०१४-१५ मध्ये गोदावरी नदीवरून राष्ट्रीय पेयजलमधून पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली असतांना नंतर सत्तेवर आलेल्या मंडळाने त्यात बदल करून भालेराव तळय़ावरून नवीन पाणी योजना करण्याचा घाट घातला आहे. पाणी योजना होणे गरजेचे आहे, मात्र पाण्याचा उद्भव हा गोदावरी नदीवरून असावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यात बदल करू नये, अन्यथा मंत्रालयासमोर ग्रामस्थ उपोषण करतील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल आसने यांनी दिला.
प्रसंगी न्यायालयातही दाद मागितली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. नितीन आसने, रिवद्र आसने आदी उपस्थित होते. यापूर्वीची योजना १ कोटी १७ लाख रुपयांची होती. गोदावरी नदीवरून सात इंची पाईपमधून गावात पाणी आणणे, त्यासाठी स्वतंत्र वीज रोहित्र व पंप हाऊस अशी कामे समाविष्ट होती. मात्र नंतर सत्तांतर झाले. सध्याच्या सत्ताधारी मंडळाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून पूर्वीच्या योजनेचे स्वरूप बदलले. भालेराव तळय़ावरून पाणी आणण्याचा प्रस्ताव आहे.
मात्र या तळय़ात पिण्याच्या पाण्यासाठी अधिकृतपणे पाणी सोडण्याची परवानगी नाही. भविष्यात दुष्काळी परिस्थती उद्भवली आणि भंडारदरा धरणातून पाणी आले नाही तर पाणी कसे उपलब्ध होणार? गोदावरी नदीवर खानापूर बंधाऱ्यात सतत पाणी असते. तेथून खात्रीशीर पाणी उपलब्ध होणार आहे, असे असतानाही ग्रामसभेची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने योजना राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्याच्या पंच मंडळाने स्वरूप बदलून जलजीवन योजनेअंतर्गत १ कोटी ४५ लाख रुपयांची योजना करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तालुक्यात १२ योजना मंजूर असताना फक्त माळवाडगाव पाणी योजनेचेच टेंडर कसे काढले गेले? असा प्रश्न करून यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोपही आसने यांनी केला.
गावकऱ्यांचा पाणी योजनेला विरोध नाही, फक्त पाणी भालेराव तळय़ावरून आणण्याऐवजी गोदावरी नदीवरून आणावे अशी मागणी आहे. रामनवमीच्या दिवशी झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी या योजनेला विरोधही केलेला आहे. याबाबत आपण व गावकऱ्यांनी कित्येक वेळा ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र दखल घेतली जात नाही, म्हणून शेवटी आम्ही न्यायालयात दाद मागितल्याचा खुलासाही आसने यांनी केला.