Mamata Banerjee Demands SC Probe Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी बारामती येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आणि देशातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी दावा केला की, राजकीय नेत्यांसाठीही ‘कोणतीही सुरक्षा नाही’. यावेळी त्यांनी अजित पवार महायुती सोडण्याचा विचार करत होते, अशा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अलीकडील पोस्ट्सचा संदर्भ दिला.
“आज जे घडले, त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत”, असे त्या म्हणाल्या. या प्रकरणाची केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील चौकशीच विश्वसनीय असेल, असेही त्यांनी नमूद केले. “आमचा फक्त सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, इतर कोणत्याही संस्थेवर नाही”, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच तपास यंत्रणांनी आपले स्वातंत्र्य गमावले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अजित पवार VSR कंपनीच्या खासगी विमानाने प्रवास करत होते. विमानात एकूण पाच जण होते, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाने टेकऑफ केले होते आणि बारामतीत ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होणार होते, पण त्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला.
या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारी विदिप जाधव, पिंकी माळी आणि कॅप्टन सुमित कपूर व कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे.
