रिक्षा ड्रायव्हर राजेंद्र मालुसरे यांच्यासाठी २९ सप्टेंबरचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला. पेण खोपोली रस्त्यावरच्या शिरावली गावात राहतात. सकाळी उठून ते दात घासायला बाथरुममध्ये गेले. दात घासता घासता ५३वर्षीय राजेंद्र यांनी चुकून टूथब्रशच गिळला. डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हा टूथब्रश बाहेर काढला. ‘मिड डे’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

‘मी दात घासत होतो. दात घासल्यानंतर मी टूथब्रशने जीभही साफ करतो. कसं माहिती नाही पण टूथब्रश माझ्या हातून निसटला आणि घशात गेला. तिथून पोटात गेला. तो कसा गेला मलाही कळलं नाही. तो काढायचा मी प्रयत्न करू लागलो पण तो निघेना. मी ओरडू लागलो. पण माझा आवाजही फुटेना. तेवढ्यात माझी मुलगी तिथे आली. मी हाताने खुणावत तिला काय झालं ते सांगितलं. तिने माझ्या घशात हात घालून टूथब्रश काढायचा प्रयत्न केला पण तिलाही तो बाहेर काढता आला नाही. आम्ही दोघांनीही प्रयत्न केला’, असं राजेंद्र यांनी सांगितलं.

दोघेही घाबरले. त्यांनी शेजाऱ्यांकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेलं. एका डॉक्टरांकडे त्यांना दाखवण्यात आलं पण टूथब्रश जैसे थे राहिला. त्यांनी राजेंद्र यांना नवी मुंबईतल्या मेडिकव्हर्स हॉस्पिटलमध्ये पाठवलं.

‘हे एक वेगळ्याच प्रकारचं ऑपरेशन होतं’, असं मेडिकव्हर हॉस्पिटलच्या टीमने सांगितलं. डॉ.रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वात कंसल्टंट गॅस्ट्रोनटेरोलॉजिस्ट, हेप्टॉलॉजिस्ट आणि थेरपेटिक एन्डोस्कोपिस्ट यांनी राजेंद्र यांच्या घशात अडकलेला टूथब्रश बाहेर काढला.

‘टूथब्रश गिळल्यानंतर तीन ते चार तासांनंतर राजेंद्र यांना आमच्या इथे आणण्यात आलं. त्यांना पोटात दुखू लागलं होतं. हा विचित्र प्रकारचा अपघात होता. आम्ही नक्की काय घडलंय याचा आढावा घेतला. एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ ७ इंच एवढ्या आकाराचा टूथब्रश राजेंद्र यांच्या पोटात अडकला होता. टूथब्रश हा आकाराने लांब होता, त्याला बाहेर काढणं कठीण होऊ शकलं असतं. तो बाहेर काढताना पेशंटच्या अन्य कोणत्याही अवयवाला दुखापत होऊ न देणे हे आव्हान होतं. टूथब्रश पुन्हा अडकू नये याचंही भान राखायचं होतं’, असं डॉक्टरांनी सांगितलं.

‘अर्ध्या तासाच्या एन्डोस्कोपिक प्रक्रियेद्वारे टूथब्रश काढायचं ठरवलं. टूथब्रश कडक होता, लांबलचक होता आणि पोटात आडवा पडला होता. तो टिपणं आणि पोटातून बाहेर काढणं आव्हानच होतं. आम्ही एका हूडच्या माध्यमातून टूथब्रश बाहेर काढला. पेशंटला थोड्या वेळासाठी भूल देण्यात आली होती. अन्ननलिका आणि पोट यांच्या पोकळीत टूथब्रश अडकला होता. पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीने बसवून आम्ही तिथून टूथब्रशला पुढे सरकवलं. त्यानंतर घशाच्या इथे पुन्हा एकदा तो अडकला होता. टूथब्रश कडक असतो आणि वाकत नाही त्यामुळे त्याला हळूहळू वर खेचत आम्ही बाहेर काढला’, असं डॉक्टरांनी सांगितलं.

राजेंद्र यांच्या पोटाला, अन्ननलिकेला, घशाला कोणतीही इजा होऊ न देता टूथब्रश बाहेर काढण्यात आला. टूथब्रश बाहेर काढल्यानंतर राजेंद्र यांना काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने काही तासांनंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.

राजेंद्र, त्यांची पत्नी आणि मुलींनी डॉक्टरांचे आभार मानले. ‘दुपारी अडीचच्या बेतात मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. रात्री उशिरा मी घरीही पोहोचलो. डॉक्टरांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने अवघड अशी शस्त्रक्रिया केली. मला कोणताही त्रास झाली नाही. टूथब्रश अडकल्यानंतर मला श्वास घेता येणार नाही असं वाटू लागलं. डॉक्टर आणि हितचिंतकांमुळेच मी यंदाची दिवाळी पाहू शकेन’, असं राजेंद्र यांनी सांगितलं.

माशांचे काटे, टूथपिक, चिकूच्या बिया गिळलं गेलं तर तातडीने उपचार करावेत असं डॉक्टरांनी सांगितलं. अख्खा टूथब्रश गिळला जाणे हा प्रकार भीतीदायक असू शकतो. टूथब्रश आत गेला तर शरीराचं नुकसान करू शकतो. दुर्देवाने असा प्रसंग घडल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.