विरार : एटीएममध्ये असलेल्या एका अनोळखी तरुणाने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एकाला तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

विरारमध्ये एका भेळपुरीच्या व्यावसायिकाला एटीएममध्ये एका चोराने मोठय़ा हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून तब्बल अडीच लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात राहणारे ओमप्रकाश गुप्ता  ते २१ ऑगस्टला घराजवळील बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. या वेळी एटीएमजवळ एक २० ते २५ वर्षांचा अनोळखी तरुण उभा होता. एटीएम मशीनमधून पैसे निघत नसल्याने गुप्ता या तरुणाने गुप्ता यांना मदत केली, मात्र हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून दिले. पैसे घेऊन गुप्ता घरी आले. त्यांना गरज नसल्याने त्यांनी कार्ड घरीच ठेवले. पण २१ तारखेपासून २५ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यातून २ लाख ६४ हजार रुपये अचानक गायब झाले. त्यांना वारंवार दुकानातून खरेदी केल्याचे संदेश मोबाइलवर येत होते. यामुळे त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. विरार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.