महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या लोहगडावर ट्रेकर्स कायमच ट्रेकसाठी जात असतात. सिया गोयल या तरुणीने केतन अग्रवालची हत्या केली ती याच लोहगडावरुन. त्यामुळेही लोहगड चर्चेत आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला ही लोहगडाची खरी ओळख. हाच लोहगड पुन्हा चर्चेत आला आहे एका व्हायरल व्हिडीओमुळे.

नेमकं प्रकरण काय?

लोहगडावर दिल्लीचे काही पर्यटक गेले होते. या पर्यटकांपैकी एकाने तिथे सिगारेटचे झुरके घेण्यास सुरुवात केली. या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हे दिसतं आहे की काही तरुण तरुणी हे लोहगडावर आलेत त्यापैकी एक जण सिगारेट ओढतो आहे. तिथे असलेल्या एका मराठी पर्यटकाने त्यांना चांगलंच झापलं. ज्यानंतर त्या पर्यटकाने सिगारेट विझवली आणि तिथेच फेकली. ती विझवलेली सिगारेटही या मराठी पर्यटकाने त्या सगळ्यांना उचलायला लावली आणि सगळ्यांकडे असलेली सिगारेटची पाकिटं आपल्या ताब्यात घेतली. असं या व्हिडीओत दिसतं आहे.

मराठी पर्यटकाने सिगारेट ओढणाऱ्या तरुणांना झापलं

व्हिडीओत दिसतं आहे त्याप्रमाणे तरुण-तरुणींचा एक ग्रुप लोहगडावर आला.त्यातल्या एकाने सिगारेट पेटवली आणि झुरके घेऊ लागला. ज्यानंतर एका मराठी पर्यटकाने त्यांना हटकलं. तू सिगारेट कशी काय ओढतो आहेस? तुला कळत नाही का हे ऐतिहासिक ठिकाण आहे. ज्यावर तो मुलगा म्हणाला की मला माहीत नव्हतं आणि इथे कुठेही नो स्मोकिंगचा बोर्ड नाही. त्यानंतर मराठी पर्यटक आणखी चिडतो आणि दरडावून विचारतो तुम्ही जर मंदिरात गेलात तर तिथे सिगारेट ओढाल का? त्यावर ते तरुण तरुणी नाही असं म्हणतात. मग मराठी पर्यटक त्यांना सांगतो तुमच्यासाठी जसं मंदिरात जाणं आहे तसंच आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला. तुम्ही कुठून आलात? हे विचारल्यावर सगळे आम्ही दिल्लीतून आलो असं सांगतात. त्यावर तो मराठी पर्यटक म्हणतो मी तुमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो. कारण लोहगडावर सिगारेट ओढणं गुन्हा आहे, तसंच त्यांची पाकिटंही ताब्यात घेतो. असं या १ मिनिट ४६ सेकंदांच्या व्हिडीओत दिसतं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कुठल्याही किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी सिगारेट ओढणं मद्यपान करणं इतर आक्षेपार्ह कृती करणं या सगळ्याला मनाई आहे. या पर्यटकांनी आम्हाला काहीही माहीत नव्हतं म्हणत कानावर हात ठेवले आहेत. पण मराठी पर्यटकाने या सगळ्यांना चांगलेच खडे बोल सुनावत त्यांच्याकडच्या सिगारेट्सची पाकिटं ताब्यात घेतली आहेत.