औरंगाबाद, अहमदनगर आणि बीडपाठोपाठ सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबटय़ाने धुमाकूळ घातल्यामुळे तेथील संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. आतापर्यंत तिघांना मारणाऱ्या या बिबटय़ाला पकडण्यासाठी वन विभागाची यंत्रणा अधिक सक्रिय झाली असली तरी सर्वाच्या डोळ्यांदेखत बिबटय़ा चकवा देऊन निसटून पळून जातो. सोलापूर जिल्ह्य़ात एखाद्या नरभक्षक बिबटय़ाने दहशत माजविल्याचा हा अनुभव या भागातील नागरिकांसाठी नवीन आहे.
उजनी धरण तथा जलाशयाच्या लाभक्षेत्रात ऊस, केळी आणि अन्य पिकांच्या शेतीचे सलग पट्टे आहेत. या शेती पट्टय़ात शिरकाव केलेल्या बिबटय़ाने गेल्या महिन्यापासून दहशत माजवायला सुरुवात केली असून प्रार्थना भिलारवाडी भागात गाय-वासरावर बिबटय़ाने हल्ला केला होता. यात वासराचा मृत्यू झाला तर गाय गंभीर जखमी झाली होती, परंतु गाय-बैल, शेळ्या-मेंढय़ांना भक्ष्य बनविणारा हिंस्र श्वापद बिबटय़ाच असल्याची खात्री प्रशासनालाही पटली नव्हती. कारण हे सर्व अनपेक्षित होते. अलीकडे मात्र अवघ्या चार-पाच दिवसांत एकापाठोपाठ एक असे तीन जीवांचे बळी गेल्यानंतर नरभक्षक बिबटय़ाच असल्याची खात्री वन विभागाला पटली आणि यंत्रणा जागी झाली.
उजनी धरण आणि जलाशयाचा भाग असलेल्या करमाळा तालुक्यालगत पुणे, नगर, बीड आणि उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ांच्या सीमा आहेत. भिगवण, इंदापूर (पुणे), कर्जत (नगर), आष्टी (बीड), परांडा (उस्मानाबाद) ही लहानमोठी शहरे आणि गावे करमाळा तालुक्याला चिकटून आहेत. अलीकडे यातील बहुतांशी भागात हिंस्र बिबटय़ाचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर, आतापर्यंत नऊ जणांचे बळी बिबटय़ाने घेतल्याचे आढळून आले आहे.
बिबटय़ाच्या हल्ल्यात जीव गमावण्याची पहिली घटना १६ नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये घडली. यात अशोक आवटे (वय ५०) आणि कृष्णा आवटे (वय ३०, आपेगाव, ता. पैठण) यांचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर २१ नोव्हेंबरला छबुबाई राठोड (वय ४४, पाथर्डी, नगर), २४ नोव्हेंबर रोजी नागनाथ गर्जे (वय ३५, सुरुडी, ता. आष्टी, बीड), २७ नोव्हेंबर रोजी स्वराज भापकर (वय १०, किन्ही, ता. आष्टी) असे पाच बळी गेले. त्यानंतर करमाळा भागात ३ डिसेंबर रोजी लिंबेवाडीत कल्याण देवीदास फुंदे (वय ४०) हा शेतकरी बिबटय़ाचा भक्ष्य ठरला. त्यापाठोपाठ ५ डिसेंबर रोजी अंजनडोह शिवारात जयश्री दयानंद शिंदे (वय २५) या शेतमजूर महिलेचा बिबटय़ाने जीव घेतला. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी चिखलठाण येथे ऊसतोड मजुराची मुलगी फुलाबाई हरिश्चंद्र कोठले (वय ८, दुसाने, साक्री, धुळे) हिच्यावरही बिबटय़ाने हल्ला करून तिचाही बळी घेतला.
नरभक्षक बिबटय़ाची अशा प्रकारे दहशत वाढल्यामुळे औरंगाबाद, नगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यासह आसपासच्या भागात गावकऱ्याची अक्षरश: झोप उडाली आहे. यातच त्या त्या भागांतील वन विभागाच्या यंत्रणांना बिबटय़ा सतत गुंगारा देऊन तावडीतून निसटला असतानाच आता करमाळा भागातही बिबटय़ाने दहशत माजविली आहे. माणसावर हल्ला करण्याची आणि शिकार खाण्याची पद्धत पाहता आणि एकूणच हालचाली पाहता औरंगाबाद, नगर, बीडनंतर आता करमाळा भागात दहशत माजविणारा बिबटय़ा एकच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बिबटय़ा मनुष्याच्या मानेचे लचके तोडतो. यंत्रणेच्या निष्कर्षांनुसार सध्या एकच बिबटय़ाचे अस्तित्व दिसत असले तरी मांगी आणि अन्य गावांमध्ये तीन ते चार बिबटय़ांचा वावर असल्याचे तेथील गावकरी सांगतात.
सध्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी करमाळा परिसरात उजनी जलाशयाच्या काठावर प्रचंड प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. त्यासाठी काही हजार ऊसतोड मजुरांच्या जथ्यांचा मुक्काम आहे, परंतु बिबटय़ाने कहर केल्यामुळे उसाच्या फडात ऊसतोड मजुरांचा कोयता भयभीत होऊन चालेनासा झाला आहे. वन विभागानेही बिबटय़ाचा अधिवास असलेल्या परिसरात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे तेथील सारा दिनक्रमच बिबटय़ाच्या दहशतीखाली चालत आहे. अलीकडे करोनापश्चात सुरू झालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या हजेरीचे प्रमाण खूपच घटले आहे. बिबटय़ाच्या भीतीमुळे पालकवर्ग विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाही.
नरभक्षक बिबटय़ाची वाढती दहशत आणि त्यातून निर्माण झालेले भयग्रस्त वातावरण पाहता रक्ताला चटावलेल्या बिबटय़ाला ठार मारण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधीही करीत आहेत. वन विभागानेही बिबटय़ा सापळ्यात न गवसल्यास त्याला ठार मारण्याची योजना हाती घेतली आहे. १५ पिंजरे लावण्यात आले असून ४० कॅमेरे सापळे आणि इतर अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून बिबटय़ाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीन विशेष पथकेही तैनात असून नेमबाजांनाही पाचारण करण्यात आले आहे.
ताज्या प्रकारात बिबटय़ा शेजारच्या शेटफळ शिवाराच्या दिशेने पळून गेला आणि पुन्हा काही वेळाने त्याने एका महिलेवर हल्ला केला. त्यामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. नेमबाजांच्या मते बिबटय़ा साडेचार वर्षांचा असून तो खूपच चपळ आहे. करोना टाळेबंदीकाळात मानवी हालचाली कमी झाल्या होत्या. शेतातील कामेही बंद होती. जवळपास निर्मनुष्य असलेल्या भागात भक्ष्यांच्या शोधात बिबटय़ांचा वावर वाढला. आता मानवी दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू होऊन ते वाढले आहेत. तूर्त नरभक्षक बिबटय़ाला जिवंत पकडण्याचे किंवा अधिक मनुष्यहानी टाळण्यासाठी त्याला ठार मारण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.
गोळ्या घालण्याची नागरिकांची मागणी
बिबटय़ाची वाढती दहशत आणि त्यातून निर्माण झालेले भयग्रस्त वातावरण पाहता रक्ताला चटावलेल्या बिबटय़ाला ठार मारण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यायांसह लोकप्रतिनिधीही करीत आहेत. वन विभागानेही बिबटय़ा सापळ्यात न गवसल्यास त्याला ठार मारण्याची योजना हाती घेतली आहे. १५ पिंजरे लावण्यात आले असून ४० कॅमेरे सापळे आणि इतर अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून बिबटय़ाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीन विशेष पथकेही तैनात असून नेमबाजांनाही पाचारण करण्यात आले आहे.
बिबटय़ा कितीही चपळ वा चलाख असला तरी लवकरच त्याचा निश्चितपणे बंदोबस्त करून स्थानिक भागाची दहशतीपासून सुटका केली जाईल.
– धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, वनविभाग
