सांगली : बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्या चलनात आणण्यासाठी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकास सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. संबंधिताने घरी उभारलेला बनावट नोटा छपाई करणारा कारखाना उदध्वस्त केला आहे. त्याच्याकडून एक लाख ९० हजार रुपयांच्या बनावट नोटा व त्या बनविण्याची दोन लाख रुपये किंमतीची यंत्रसामुग्री असा एकूण तीन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती सांगली शहर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

अटक केलेल्यात अहद महंमद अली शेख (वय ४०, रा. शनिवार पेठ, गणपती मंदिरानजीक, मिरज, जि. सांगली) याचा समावेश आहे. अहद शेख हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असून १० व २० रुपयांच्याही बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. गत एक वर्षांपासून अहद शेख अशा पध्दतीने बनावट नोटा बनवून त्या स्वतः बाजारपेठेत चलनात आणत होता. अहद शेख याने सात हजार रुपयांच्या बदल्यात दहा हजार रुपयाच्या बनावट नोटाही काहीजणांना दिल्याची माहिती पोलिस चौकशीत सामोरी आली आहे. त्यामुळे आतापर्यंत किती बनावट नोटा चलनात आणल्या ? या बनावट नोटा कोठे- कोठे वापरल्या ? व या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा…सोलापुरात जड वाहतुकीने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

मिरज शहरातील एक संशयित बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्या सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्रानजीक विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलिस हवालदार संतोष गळवे, गौतम कांबळे व संदीप पाटील यांना मिळाली होती. या माहिती आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे व पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली या पोलिस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अहद शेख याला ताब्यात घेतले. अहद शेख याच्या अंगझडतीत त्याच्याकडे ५० रुपयांच्या ७५ बनावट नोटा मिळून आल्या.

हेही वाचा…ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात असल्याच्या शिंदे गटाच्या दाव्याला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

अहद शेख याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता स्वतःच्या घरी बनावट नोटा तयार करण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची माहिती सामोरी आली. त्या आधारे सांगली शहर पोलिसांनी अहद शेख याने मिरज येथील घरी सुरु केलेल्या कारखान्यावर छापा टाकून ५० रुपयाच्या प्रत्येकी शंभर नोटाचे ३८ बंडल बनावट नोटा व या बनावट नोटा छपाई करण्यासाठीचे यंत्र, कागद, विविध प्रकारची शाई व अन्य साहित्य जप्त केले आहे. अहद शेख याला आज सांगली येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.