रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला येथील विशेष पॉस्को न्यायालयाने २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा व ४० हजार ५०० रुपये दंड ठोठावला.इक्बाल इस्माईल मोनये (वय ३८, रा. तळगाव, काझीवाडी, ता. राजापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालवधीत घडली होती. पीडित मुलगी ही मोलमजुरी करणारी होती. आरोपी इक्बाल मोनये याची दोन वर्षांपूर्वी तिच्याशी ओळख झाली होती. २३ जानेवारी २०२० रोजी त्याने खोली सारवण्याच्या बहाण्याने तिला बोलावून लैंगिक अत्याचार केला तसेच ही गोष्ट कुणाला सांगितलीस तर ठार मारून टाकीन, अशी धमकीही दिली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२० रोजी पीडित मुलीची आई दातांच्या डॉक्टरकडे राजापूरला आली होती. आई दुपारनंतर परत आली नाही म्हणून तिच्या आजोबांनी तिला इक्बालच्या मोबाईलवरुन फोन करण्यास सांगितले. त्या वेळी पुन्हा इक्बालने पीडितेवर अत्याचार केला. काही दिवसानंतर राजापूर येथे आईने तिला डॉक्टरकडे नेले. त्या वेळी मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे उघड झाल्यानंतर ५ जून २०२० रोजी राजापूर पोलिस ठाण्यात पीडितेने तक्रार दिली.पोलिसांनी लगेच आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६ व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम २०१२ (४) व (६) अन्वये गुन्हा दाखल केला. राजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एल. मौले यानी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल.े  विशेष पॉस्को न्यायालयाने बुधवारी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये १० सरकारी कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर आदींचा समावेश होता.