कळवा नाका भागातील खारेगाव टोल नाक्याजवळ एका २३ वर्षांच्या तरूणाला कार चालवताना हार्ट अॅटॅक आला, मात्र ही बाब ट्रॅफिक पोलिसाच्या लक्षात आली. त्याने तातडीने या तरूणाला ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले ज्यामुळे या तरूणाचे प्राण वाचले आहेत. निखिल तांबोळे असे हृदयविकाराचा झटका आलेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी निखिल आपल्या कारने प्रवास करत होता. तो खारेगाव टोल नाक्याजवळ आला तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला. पांडुरंग मुंडे या वाहतूक पोलीस हवालदाराने तातडीने या तरूणाला रूग्णालयात दाखल केले. बुधवारी ही दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पांडुरंग मुंडे या वाहतूक पोलिसाने तरूणाचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. वाहतूक विभागाचे उप आयुक्त अमित काळे यांच्या हस्ते मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. निखिल तांबोळे हा भिवंडी जवळच्या पडघा गावातून ठाण्यात येत नाही. त्याच्यासोबत त्याचे वडिलही होते. निखिल तांबोळे कार चालवत होता त्याने अचानक ती थांबवली. त्याच्या छातीत दुखू लागले होते, त्यावेळी पांडुरंग मुंडे यांनी तातडीने या तरूणाला ज्युपिटर रूग्णालयात दाखल केले.

अनेकदा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तो कमी व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांमध्ये जनजागृती केली जाते. मुंडे यांनी जे प्रसंगावधान दाखवले त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे असे मत काळे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे यांनी या तरूणाला कारमध्ये छातीत दुखू लागल्याचे पाहिले आणि त्यानंतर तातडीने दुसऱ्या एका चालकाला त्याची कार घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. तिथे गेल्यावर या तरूणाला हृदयविकाराचा झटका आला होता असे समजले. आता या तरूणाची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयाने म्हटले आहे.