लातूर : करोनामुळे पत्नी मेहरुन्नीसाचे निधन झाल्यानंतर राज्य शासनाकडून मिळालेली पन्नास हजार रुपयांची मदत प्राणी-पक्षी यांच्या देखभालीसाठी खर्च करण्याचा निर्णय येथील प्राणी-पक्षिप्रेमी मेहबूबचाचा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मेहबूबचाचांनी २४ हजार रुपयांच्या मातीच्या पसरट छोटय़ा कुंडय़ा विकत घेतल्या असून या पसरट कुंडय़ांमध्ये पाणी घालून त्या दोरीने झाडांवर बांधता येऊ शकतात. यात पाणी घालून ठेवले तर सध्याच्या ऐन उन्हाळय़ात पक्ष्यांना हे पाणी पिता येऊन त्यांची तहान भागू शकेल, असा उद्देश या मागे आहे. या कुंडय़ाचे ते मोफत वाटप करत आहेत. तसेच त्यांनी दहा हजार रुपये किमतीची झाडांचे संरक्षण करणारी साधनसामग्री विकत घेतली. मोठी झाडे लावून त्याभोवती याचे संरक्षक कवच उभे केले आहे. तर १६ हजार रुपयांची रक्कम जखमी पक्षी, प्राणी यांच्यावर वैद्यकीय उपचारांसाठी राखून ठेवली आहे. जखमी पक्षी बरे झाल्यानंतर त्या पक्ष्यांना ते पुन्हा मोकळय़ा हवेत सोडून देतात. घरखर्च आणि उदरनिर्वाहासाठी ते टेम्पोचालक म्हणून काम करतात.