अलिबाग – तालुक्यातील मांडवा येथे लवकरच मरिना प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या आठ दिवसांत या प्रकल्पाचा आराखडा तयार होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मांडवा परिसरात सध्या बोटी उभ्या करण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भरती-ओहोटीच्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होतात. वाढते पर्यटन आणि तालुक्याचा विकास लक्षात घेता जेट्टीजवळ मरिना उभारण्याची मागणी आमदार आ. महेंद्र दळवी यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन मंत्री राणे यांनी मंगळवारी मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत मांडवा येथील मरिना उभारणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. अखेरीस अत्याधुनिक ‘मरिना’ उभारण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. मंत्री राणे यांनी या प्रकल्पाचा आराखडा तातडीने तयार करून पुढील 15 दिवसांत कामाची निविदा निघाली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले.
मांडवा येथे मरिना उभारण्यात आल्यास छोट्या प्रवासी बोटी, यॉट्स आणि लहान जहाजांसाठी सुरक्षित बंदर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटन, रोजगारनिर्मिती, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. तसेच पायाभूत सुविधांचा विकास होऊन मांडवा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंदर म्हणून ओळख निर्माण करू शकते.
