अलिबाग – नागोठणे येथील एस.टी. बसस्थानकात चालकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना ५ जून २०१९ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास नागोठणे एस.टी. बसस्थानकात घडली होती. फिर्यादी दिपक उमाजी खंडागळे हे पेण आगारातील एस.टी. चालक असून ते पेण-पाली मार्गावरील बस (एमएच ४० एन ८४०१) घेऊन नागोठणे डेपोमध्ये प्रवेश करत होते. त्यावेळी आरोपींनी मोटारसायकल बससमोर उभी केली. ती बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी चालकाला बसमधून खाली ओढत त्याच्यावर मारहाण केली. या झटापटीत त्यांचे कपडे फाडण्यात आले.
या प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एस. करांडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुकेश के. पाटील यांनी दिलेल्या निकालात आरोपी आखिब आबिद इलामी, आदिल सलाम पानसरे व अरमान अब्दुल रशीद मन्सुरी यांना दोषी ठरवले. त्यांना भा.द.वि. कलम ३५३ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड, कलम ३३२ अंतर्गत ६ महिने सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड, तसेच कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. तसेच या खटल्याच्या कामकाजात पोलिस कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
