अलिबाग (प्रतिनिधी ): रायगड जिल्हा परीषदेच्या ( राजिप ) अध्यक्ष व उपध्यक्षपदासाठी आज गुरूवारी (दि. 12) निवड होणार आहे. राजिपच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष विराजमान होणार आहे. त्यामुळे भाजपने अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी देखील सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पनवेल मधील केळवणे गटातील सदस्य मंगेश वाकडीकर यांचे नाव जाहीर केले आहे.
रायगड जिल्हा परीषदेची निवडणूक ७ फेब्रुवारीला पार पडली.
९ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला १५, राष्ट्रवादी काँग्रेस १६, शिवसेना शिंदे गटाला २१ , शिवसेना ठाकरे गट ५ , काँग्रेसला २ जागा मिळाल्या. कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी निवडणूक पूर्व युती असल्याने भाजप राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता शिवसेना देखील राजिपच्या सत्तेत सहभागी होणार आहे. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांमध्ये मुंबईत चर्चा सुरू झाली आहे.
रायगड जिल्हा परीषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक १२ मार्च रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष पादाच्या निवडणूकीसाठी गुरूवारी सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जातील. दुपारी २ वाजता बैठक सुरू होईल.
त्यात उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ज्यांचे अर्ज वैध ठरले आहेत त्यांची नावे जाहीर केली जातील. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी कालावधी दिला जाईल. गरज भसल्यास अध्यक्ष व उपध्यक्ष या दोन्ही पदांसाठी मतदान घेण्यात येईल. मात्र शिवसेना शिंदे गटही सत्तेत सहभागी होणार असल्याने, अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार आहे. त्यामुळे भाजपाने अलिबामध्ये आनंदोत्सवाची तयारी देखील सुरू केली आहे. नियोजन भवन येथील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या मैदानावर भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्यासह उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
